फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Women Commercial Pilot Eligibility: भारताचे नागरी विमानचालन क्षेत्र वेगाने विस्तारत आहे आणि त्यासोबतच ‘कमर्शियल पायलट’ बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांची संख्याही वाढत आहे. नागरी विमानचालन मंत्रालयाने राज्यसभेत प्रसिद्ध केलेली आकडेवारी दर्शवते की, देशात महिला कमर्शियल पायलटचा सहभाग सातत्याने वाढत आहे. ३० जून २०२६ पर्यंत जारी केलेल्या दर चार कमर्शियल पायलट लायसन्सपैकी सुमारे एक लायसन्स महिला उमेदवाराला मिळाले आहे.
आशा परिस्थितीत आज आपण जाणून घेणार आहोत की, कमर्शियल पायलट बनण्यासाठी काय पात्रता लागते? तसेच त्यांना सुरुवातीस त्यांना पगार किती असतो?
नागरी विमानचालन मंत्रालयानुसार, ३० जून २०२६ पर्यंत एकूण १,३३१ कमर्शियल पायलट लायसन्स (CPL) जारी करण्यात आले. यामध्ये ३४८ लायसन्स महिलांना मिळाले, म्हणजेच महिलांचा एकूण वाटा २६.१४ टक्के राहिला. तर २०२१ मध्ये ८६२ सीपीएम जारी झाले होते, ज्यामध्ये १६६ महिलांना लायसन्स मिळाले होते. महिला वैमानिकांच्या सहभागाच्या बाबतीत भारत जगात आघाडीवर असलेल्या देशांमध्ये समाविष्ट आहे.
शैक्षणिक पात्रता: उमेदवाराने १२ वी परीक्षा फिजिक्स आणि मॅथ्स या विषयांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
ओपन स्कूल पर्याय: जर एखाद्या विद्यार्थ्याने १२ वीत फिजिक्स किंवा मॅथ्स वाचलेले नसेल, तर तो मान्यताप्राप्त ‘ओपन स्कूल’द्वारे या विषयांची परीक्षा उत्तीर्ण होऊनही पात्रता मिळवू शकतो.
वयोमर्यादा: उमेदवाराचे किमान वय १७ वर्षे असावे, तर ‘कमर्शियल पायलट लायसन्स’ मिळवण्यासाठी १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
वैद्यकीय चाचणी: प्रशिक्षण सुरू करण्यापूर्वी डीजीसीएची (DGCA) मेडिकल फिटनेस टेस्ट उत्तीर्ण करावी लागते.
१. कमर्शियल पायलट बनण्यासाठी सर्वात आधी DGCA च्या कॉम्प्युटर नंबरसाठी अर्ज करावा लागतो.
२. यानंतर ग्राउंड ट्रेनिंग दरम्यान एअर रेग्युलेशन, एअर नॅव्हिगेशन, एव्हिएशन मेटिओरॉलॉजी (हवामानशास्त्र) आणि इतर विषयांचा अभ्यास केला जातो.
३. DGCA च्या लेखी परीक्षेत निश्चित गुण मिळवल्यानंतर फ्लाइट ट्रेनिंग पूर्ण करावी लागते.
४. CPL साठी किमान २०० तासांचे फ्लाइंग ट्रेनिंग अनिवार्य असते. यामध्ये सोलो फ्लाइंग, क्रॉस कंट्री फ्लाइंग, नाइट फ्लाइंग, इन्स्ट्रुमेंट फ्लाइंग आणि मल्टी इंजिन विमानाचे प्रशिक्षण समाविष्ट असते.
५. सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर आणि स्किल टेस्ट पास केल्यानंतर DGCA ‘कमर्शियल पायलट लायसन्स’ जारी करते.
लायसन्स मिळाल्यानंतर सुरुवातीला उमेदवाराला ‘ट्रेनी पायलट’ किंवा ‘फर्स्ट ऑफिसर’ म्हणून नियुक्ती मिळते. या काळात वार्षिक १२ लाख ते २५ लाख रुपये पर्यंतचे पॅकेज मिळते. ते अनुभवानुसार वाढत जाऊन २५ ते ५० लाख रुपये वार्षिक पर्यंत पोहोचू शकतो. तसेच कॅप्टन बनल्यानंतर अनेक एअरलाइन्समध्ये वार्षिक पॅकेज १ कोटी रुपये किंवा त्याहून अधिक असू शकते. आंतरराष्ट्रीय एअरलाइन्समध्ये काम करणाऱ्या वरिष्ठ वैमानिकांची कमाई यापेक्षाही जास्त असते.
कमर्शियल पायलटला पगाराव्यतिरिक्त ट्रॅव्हल अलाउन्स, हॉटेलमध्ये राहण्याची सुविधा, फॉरेन लेओव्हर, मोफत एअर तिकिटे आणि इतर भत्ताही मिळतात. मात्र, पायलट ट्रेनिंगचा खर्चही खूप जास्त असतो. भारतात CPL ट्रेनिंगसाठी सहसा ४० ते ८० लाख रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो, तर परदेशातून प्रशिक्षण घेतल्यास हा खर्च १ कोटी रुपयांपेक्षा जास्त जाऊ शकतो.






