ISRO Internship (फोटो सौजन्य- सोशलमीडिया) ISRO Internship (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
ISRO Internship 2026 News: ISRO हे नाव ऐकताच आपल्या डोळ्यासमोर येते ते म्हणजे मोठं अंतराळ किंवा अंतरावीर. प्रत्येक विज्ञान क्षेत्रातील काम करणाऱ्या विद्यार्थ्याचे स्वप्न असते की, आपण अवकाश संशोधनात काम करावे. आता तेच स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यासाठी इस्रो एक मोठी संधी घेऊन येत आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोने आता विद्यार्थ्यासाठी इंटर्नशिप करण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. या इंटर्नशिपमध्ये विद्यार्थ्यांना अनुभवी शास्त्रज्ञांसोबत काम करता येणार आहे.
देशातील अनेक विद्यार्थी इस्रोमध्ये काम करण्याचे स्वप्न पाहतात. मात्र, त्या वातावरणाचा अनुभव घेण्याची संधी फार कमी जणांना मिळते. ही इंटर्नशिप अशा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना विविध संशोधन प्रकल्प, प्रयोगशाळेतील कामकाज आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा जवळून अभ्यास करता येईल. या इंटर्नशिपला केवळ भारतीय नागरिक अर्ज करू शकतात.
इंटर्नशिपचा कालावधी तीन ते सहा आठवड्यांदरम्यान असेल. या काळात विद्यार्थ्यांना इस्रोच्या विविध विभागांमध्ये प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळेल. संशोधन पद्धती, तांत्रिक विश्लेषण आणि वैज्ञानिक प्रकल्पांची माहिती याचा प्रत्यक्ष अनुभव या प्रशिक्षणातून मिळणार आहे. मात्र, हा केवळ शैक्षणिक प्रशिक्षण कार्यक्रम असल्यामुळे कोणतेही मानधन, स्टायपेंड, राहण्याची किंवा जेवणाची सुविधा दिली जाणार नाही.
निवड प्रक्रिया विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीवर आणि संबंधित केंद्रातील उपलब्ध जागांवर आधारित असेल. तसेच प्रयोगशाळांची क्षमता आणि मार्गदर्शकांची उपलब्धता लक्षात घेऊन अंतिम निवड केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना ई-मेलद्वारे माहिती पाठवली जाईल. एका विद्यार्थ्याला त्याच्या संपूर्ण पदवी शिक्षणादरम्यान फक्त एकदाच या इंटर्नशिपमध्ये सहभागी होता येणार आहे.
बीएससी विद्यार्थ्यांसाठी अर्ज प्रक्रिया 14 ऑगस्ट 2026 पासून सुरू होणार असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 14 सप्टेंबर 2026 निश्चित करण्यात आली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण नोव्हेंबर 2026 ते जानेवारी 2027 या कालावधीत पार पडणार आहे.
गुणपत्रिका
महाविद्यालयाचे परवानगीपत्र
प्रकल्पांचा तपशील
तांत्रिक कौशल्ये
इतर आवश्यक कागदपत्रे एकाच पीडीएफ(PDF) स्वरूपात अपलोड करावी लागतील.
बंगळुरूतील यू. आर. राव सॅटेलाइट सेंटर
अहमदाबादमधील स्पेस ॲप्लिकेशन्स सेंटर
तिरुवनंतपुरममधील विक्रम साराभाई स्पेस सेंटर
श्रीहरिकोटातील सतीश धवन स्पेस सेंटर
डेहराडूनमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग
अवकाश विज्ञान, उपग्रह तंत्रज्ञान किंवा संशोधन क्षेत्रात करिअर करण्याचा विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही इंटर्नशिप एक महत्त्वाची पायरी ठरू शकते. पुस्तकातील ज्ञानासोबत प्रत्यक्ष संशोधनाचा अनुभव मिळाल्यास भविष्यातील करिअरसाठी मोठा फायदा होऊ शकतो. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज करून या संधीचा नक्की लाभ घ्यावा.






