फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Pralhad Joshi Salary: देशाच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. परीक्षांमधील गैरव्यवहार आणि देशव्यापी निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता शिक्षण मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतींनी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी (Pralhad Joshi) यांच्याकडे देशाच्या शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे. विशेष म्हणजे, इतक्या मोठ्या आणि महत्त्वाच्या मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी स्वीकारूनही प्रल्हाद जोशी यांच्या पगारात एक रुपयाचीही वाढ होणार नाही.
भारतात केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांचे वेतन आणि भत्ते ‘संसद सदस्य वेतन, भत्ता आणि पेन्शन कायद्या’ अंतर्गत ठरवले जातात.
भारतीय संविधान आणि संसदीय नियमांनुसार ‘लाभाचे पद’ या तत्त्वाचे काटेकोर पालन केले जाते. या नियमांनुसार, कोणताही मंत्री एकाच वेळी एकाच पदाच्या वेतनास पात्र असतो.
मंत्र्याकडे एका विभागाची जबाबदारी असो किंवा चार विभागांची, त्यांना मिळणारा पगार कॅबिनेट मंत्र्याच्या एकाच पदाचा राहतो. अतिरिक्त मंत्रालयाचा कार्यभार हा तात्कालिक ‘अतिरिक्त कार्यभार’ मानला जातो, ज्यासाठी कोणताही वेगळा पगार किंवा भत्ता देण्याची तरतूद नाही.
कर्नाटकच्या धारवाड लोकसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा (२००४ ते २०२४) विजयी झालेले प्रल्हाद जोशी हे केंद्र सरकारमधील अत्यंत अनुभवी आणि विश्वासू नेते मानले जातात. ते सध्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे (ISA) अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत.
शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार मिळाल्यानंतर आता त्यांच्याकडे एकूण तीन महत्त्वाची मंत्रालये आली आहेत. ज्यामध्ये शिक्षण मंत्रालयच्या अतिरिक्त कार्यभारासोबत ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय तसेच नवीन आणि नूतनीकरणीय ऊर्जा मंत्रालय यांचा समावेश आहे.






