फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Civil Police Constable: गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी आणि त्यांच्या आंदोलनांची चर्चा सुरूच आहे. दिल्लीतील जंतरमंतर येथे नीट पेपर लीकविरोधात झालेली विद्यार्थ्यांची आंदोलने अद्यापही चर्चेत आहेत. पेपर लीक आणि निकाल जाहीर झाल्यानंतर नीटच्या ओएमआर (OMR) शीटवरूनही वाद सुरू आहे. दरम्यान, OMR शीटशी संबंधित आणखी एक प्रकरण समोर आले असून, ते वैद्यकीय प्रवेश परीक्षेचे नसून पोलिस भरती परीक्षेचे आहे.
कर्नाटक सिव्हिल पोलिस कॉन्स्टेबलच्या ३,९९१ पदांच्या भरतीसाठी लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. कर्नाटक परीक्षा प्राधिकरतर्फे ही परीक्षा २ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यभरातील ८०० हून अधिक केंद्रांवर घेण्यात आली. कर्नाटकच्या विजयपुरा येथील एका परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेनंतर ओएमआर शीट दिल्यावर मोठा गोंधळ उडाला.
विजयपुरा येथील टिकोटा शारदाम्बा पीयू कॉलेज परीक्षा केंद्रावर पोलिस कॉन्स्टेबलची परीक्षा देणाऱ्या उमेदवारांनी परीक्षेदरम्यानच हंगामा केला. OMR शीटचा नंबर प्रश्नपत्रिकेच्या नंबरशी जुळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तणाव निर्माण झाला आणि त्यातील काही विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ध्यावरच सोडली. यानंतर ते परीक्षा केंद्राबाहेर आले आणि त्यांनी रोष व्यक्त केला.
विद्यार्थ्यांच्या या गर्दीवर नियंत्रण मिळवणे पोलिसांसाठीही कठीण होऊ लागले. या सर्व वादानंतर कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाच्या कार्यकारी संचालकांकडूनही याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले.
या प्रकारानंतर कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाच्या कार्यकारी संचालकांनी स्पष्ट केले की, ‘कोणत्याही अधिकृत सूचना, निर्देश पुस्तिका किंवा तोंडी सूचनांमध्ये असे कुठेही सांगण्यात आले नव्हते की OMR नंबर आणि प्रश्नपत्रिकेचा नंबर एकच असला पाहिजे.’
त्यांनी पुढे सांगितले की, ‘OMR उत्तर पत्रिकेत प्रश्नपत्रिकेचा सिरीज कोड आणि व्हर्जन कोड भरण्याची तरतूद असते.’
कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, OMR नंबर आणि प्रश्नपत्रिकेचा नंबर वेगवेगळा असू शकतो. त्यामुळे परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांनी अचानक परीक्षा सोडणे आणि गदारोळ करणे केवळ परीक्षांमध्ये काही गडबड झाली असल्याच्या गैरसमजुतीमुळे घडल्याचे स्पष्ट झाले आहे. ही परीक्षा २ ऑगस्ट २०२६ रोजी पार पडली होती.






