फोटो सौजन्य - Social Media
विद्यार्थ्यांना परदेशात अधिक चांगल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी संबंधित देशांची भाषा आणि संस्कृतीचे ज्ञान असणे अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर आता राज्यात जर्मनी, जपान आणि रशिया या देशांच्या भाषांचे प्रशिक्षण देण्यावर विशेष भर दिला जात आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय कामकाज पद्धतीशी जुळवून घेण्याची क्षमता वाढणार असून, त्यांचे संवाद कौशल्य, व्यावसायिक दृष्टिकोन आणि आत्मविश्वासही अधिक मजबूत होणार आहे. परिणामी, परदेशातील रोजगाराच्या संधींमध्ये लक्षणीय वाढ होईल, असा विश्वास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ आणि कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री यांच्यात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आहे. या कराराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवरील रोजगारासाठी सक्षम बनवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी यांची उपस्थितीही उल्लेखनीय होती.
जर्मनीसारख्या प्रगत देशांमध्ये कुशल मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. राज्यातील पदविका विद्यार्थ्यांना या संधींचा लाभ मिळावा, तसेच त्यांना परदेशात रोजगार मिळवण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि भाषा प्रशिक्षण मिळावे, या उद्देशाने हा करार करण्यात आला आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ नोकरीच्या संधीच नव्हे, तर जागतिक स्तरावर काम करण्याचा अनुभवही मिळणार आहे.
‘महाराष्ट्र-जर्मनी जपान कुशल कामगार गतिशीलता’ या उपक्रमाअंतर्गत प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि उद्योगांशी समन्वय साधण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. या उपक्रमासाठी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून आवश्यक पायाभूत सुविधा, जसे की वर्गखोल्या, प्रयोगशाळा आणि नेटवर्किंग सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. याशिवाय, प्रशिक्षण कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी आणि सातत्यपूर्ण देखरेख यासाठीही योग्य समन्वय साधला जाणार आहे.
या उपक्रमामुळे राज्यातील विद्यार्थ्यांसाठी जागतिक रोजगाराच्या संधींचे नवे दालन खुले होणार असून, त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची ओळख निर्माण करण्याची मोठी संधी मिळणार आहे.






