फोटो सौजन्य- सोशल मीडिया
NEET UG Score Cut-off: दरवर्षी लाखो विद्यार्थी नीट यूजी (NEET UG) परीक्षा देतात, परंतु ‘किती गुण मिळाल्यावर सरकारी मेडिकल कॉलेज मिळेल?’ आणि ‘५०० पेक्षा कमी गुण आल्यास एमबीबीएसचे स्वप्न पूर्ण होऊ शकते का?’ हाच सर्वात मोठा प्रश्न असतो. जर तुम्हालाही ५०० पेक्षा कमी गुण मिळाले असतील, तर घाबरून जाण्याची गरज नाही. रँक आणि कॉलेजच्या ट्रेंड्सनुसार या स्कोअरवर विद्यार्थ्यांकडे कोणते पर्याय उपलब्ध असू शकतात, ते समजून घेऊया.
अंदाजित आकडेवारीनुसार, ४५० ते ४९९ गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची ‘ऑल इंडिया रँक’ (AIR) साधारणपणे ९० हजार ते १.८० लाखांच्या दरम्यान राहू शकते. तर दुसऱ्या एका अंदाजानुसार, या स्कोअरवर ५० हजार ते १ लाख पर्यंतही रँक पाहायला मिळू शकते. हा फरक दरवर्षी परीक्षेची काठिण्य पातळी, विद्यार्थ्यांची संख्या आणि कट-ऑफवर अवलंबून असतो. म्हणजेच ५०० पेक्षा कमी गुण आल्यावर रँक निश्चित नसते, परंतु विशेषतः जनरल कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता खूपच कमी होते.
तुम्हाला ४९० ते ५०० दरम्यान गुण असतील आणि तुम्ही SC, ST, OBC, EWS किंवा राज्याच्या कोणत्याही विशेष आरक्षणाचा लाभ घेत असाल, तर काही राज्यांमधील सरकारी मेडिकल कॉलेजांमध्ये जागा मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. तरीही, जनरल कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी या स्कोअरवर सरकारी एमबीबीएस सीट मिळणे कठीण मानले जाते. त्यांना स्टेट समुपदेशन किंवा विशेष परिस्थितीतच संधी मिळू शकते.
५०० पेक्षा कमी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केवळ एमबीबीएस हाच एकमेव पर्याय नसतो. या स्कोअरवर इतर अनेक कोर्सेस आणि कॉलेजांमध्येही प्रवेश मिळू शकतो, खाजगी मेडिकल कॉलेजांमध्ये MBBS, BDS (डेंटल), BAMS (आयुर्वेद), BHMS (होमिओपॅथी), BUMS आणि BSMS, इतर पॅरामेडिकल आणि हेल्थ सायन्स कोर्सेसचा यामध्ये समावेश होतो. मात्र, खाजगी मेडिकल कॉलेजांची फी सरकारी कॉलेजांच्या तुलनेत खूप जास्त असू शकते.
अंदाजित डेटांनुसार, ४०० ते ४४९ गुणांवर ऑल इंडिया रँक (AIR) सुमारे १.८० लाख ते २.८० लाखांपर्यंत जाऊ शकते. या स्कोअरवर सरकारी एमबीबीएस सीट मिळण्याची शक्यता खूपच कमी असते, परंतु खाजगी मेडिकल कॉलेज, ‘आयुष’ कोर्सेस आणि मॅनेजमेंट कोट्याद्वारे प्रवेशाच्या संधी मिळू शकतात.
केवळ NEET स्कोअर पाहून कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल हे ठरवता येत नाही. इतर अनेक बाबीही महत्त्वाच्या असतात, जसे की तुमची कॅटेगरी, तुमचे राज्य, ऑल इंडिया कोटा, त्या वर्षाचा कट-ऑफ, उपलब्ध जागांची संख्या, समुपदेशनादरम्यान कॉलेजांचा दिलेला प्राधान्यक्रम यांसारख्या सर्व बाबींचा विचार करून अंतिम सीट अलॉटमेंट केले जाते.






