रशियाचे मोठे पाऊल: २०२५ मध्ये १० लाख भारतीय कामगारांना बोलावण्याची योजना, पण युक्रेन युद्धामुळे चिंता वाढली ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Russia recruits Indian workers 2025 : इस्रायलनंतर आता रशियानेही भारतीय कामगारांसाठी आपले दरवाजे उघडले आहेत. रशियाच्या उरल चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष आंद्रेई बेसेदिन यांनी मोठा खुलासा करत सांगितले की, २०२५ पर्यंत १० लाख भारतीय कामगारांना रशियात बोलावण्याची योजना आखली गेली आहे. युद्धग्रस्त युक्रेनमधील परिस्थितीमुळे रशियामध्ये प्रचंड प्रमाणात कामगारांची कमतरता जाणवत आहे. अशा पार्श्वभूमीवर ही घोषणा भारतासाठी संधी असली, तरी सुरक्षेचा गंभीर प्रश्नही निर्माण झाला आहे.
बेसेदिन यांच्या मते, भारतासोबत झालेल्या करारानुसार या वर्षाच्या अखेरीस भारतातून रशियात कामगार पाठवले जाणार आहेत. विशेषतः स्वेर्दलोव्हस्क प्रदेशात मेकॅनिकल इंजिनिअरिंग क्षेत्रात कामगारांची गरज आहे. त्यासाठी येकातेरिनबर्ग येथे भारतीय वाणिज्य दूतावासाची स्थापना देखील करण्यात येणार आहे, जेणेकरून भारतीय कामगारांना मदत मिळू शकेल.
रशियन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, युक्रेन युद्धामुळे बरेचसे स्थानिक कामगार लष्करात भरती झाले आहेत आणि तरुण पिढी कारखान्यांमध्ये काम करायला तयार नाही. त्यामुळे भारतासोबतच श्रीलंका आणि उत्तर कोरियामधूनही कामगार आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र भारतीय आणि श्रीलंकन कामगारांना प्रशिक्षण, भाषा व सांस्कृतिक अडथळ्यांमुळे सुरुवातीला अडचणी येऊ शकतात, असाही इशारा बेसेदिन यांनी दिला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : राफेलवर नजर ठेवणारे चिनी हेर जगभर सक्रिय! ग्रीस, युक्रेन आणि इटलीत उघड झाला गुप्त कट
रशियामध्ये कामासाठी गेलेल्या काही भारतीयांना पूर्वी लष्करी सहाय्यक म्हणून युद्धभूमीवर पाठवण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. यानंतर भारत सरकारने हस्तक्षेप करत अशा भारतीयांना मायदेशी परत आणण्याची मोहीम राबवली होती. आजही काही भारतीय रशियन सैन्यात असल्याची माहिती समोर आली आहे.
ही पार्श्वभूमी पाहता, भारत सरकारने रशियातील कामगारांच्या सुरक्षिततेबाबत स्पष्ट धोरण जाहीर करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. कारण भविष्यात लाखो भारतीय युद्धाच्या सावटाखालील देशात जात असतील, तर त्यांच्या जीवनरक्षणाची जबाबदारी सरकारवर असेल.
रशियात काम करणाऱ्या भारतीय कामगारांचे वेतन तुलनेने कमी, परंतु कामाच्या मर्यादा स्पष्ट आहेत, असे समोलियोट ग्रुपच्या अनुभवावरून दिसून आले. यामुळे काही कंपन्यांना भारतीय कामगार हवे असले, तरी त्यांना योग्य प्रशिक्षण आणि समर्थन आवश्यक आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भारताच्या आत्मनिर्भरतेचे उड्डाण! बनवत आहे ‘ही’ 5 धोकादायक हायपरसोनिक क्षेपणास्त्रे; हवाई दलासाठी ठरणार गेम चेंजर
रशियाची ही योजना एकीकडे भारतीय बेरोजगारांसाठी संधी असली, तरी युक्रेन युद्धाची पार्श्वभूमी, पश्चिमी देशांचा दबाव, आणि रशियन कंपन्यांमध्ये भारतीयांबाबत असलेली अनभिज्ञता पाहता, हा निर्णय सावध पावले टाकतच घ्यावा लागेल. भारत सरकार आणि कामगार मंत्रालयाने सुरक्षा, वैधतेचे नियम, आणि लष्करात पाठवण्यासंदर्भातील अटी याबाबत खुली माहिती देणे गरजेचे आहे.