फोटो सौजन्य - Social Media
साउथ इंडियन बँक लिमिटेड ही एक खाजगी क्षेत्रातील अग्रगण्य बँक असून तिचे मुख्यालय केरळमधील त्रिशूर येथे आहे. या बँकेत जूनियर ऑफिसर/बिझनेस प्रमोशन ऑफिसर पदासाठी कराराधारित भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. ही नोकरी पूर्णतः टार्गेटवर आधारित असून भारतातील कोणत्याही नागरिकाला अर्ज करता येईल. अर्ज प्रक्रिया 19 मे 2025 पासून सुरू झाली असून शेवटची तारीख 26 मे 2025 आहे.
अर्ज फक्त अधिकृत वेबसाईटवरूनच करता येईल, इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. ही भरती चांगल्या पगारासह करिअर संधी घेऊन आली आहे. यामध्ये एकूण वार्षिक पॅकेज ₹7.44 लाख इतके असून कामगिरीनुसार प्रगतीची संधी उपलब्ध आहे. भविष्यात उमेदवाराला सहायक व्यवस्थापक (स्केल I) या पदावर नियमित कर्मचारी म्हणूनही पदोन्नती मिळू शकते.
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 एप्रिल 2025 रोजी 28 वर्षांपेक्षा अधिक नसावे. मात्र, अनुसूचित जाती व जमातीच्या उमेदवारांना वयोमर्यादेत 5 वर्षांची सूट देण्यात येते. निवड प्रक्रिया ऑनलाईन टेस्ट आणि वैयक्तिक मुलाखतीच्या स्वरूपात होणार आहे. पात्रता निकष पूर्ण केल्यामुळे थेट निवड होईलच असे नाही. अर्जांची संख्या आणि इतर घटक लक्षात घेऊन बँकेकडून शॉर्टलिस्टिंग केली जाईल.
अर्ज करण्यासाठी उमेदवाराने प्रथम अधिकृत वेबसाइटवर जाऊन वैध ईमेल आयडी आणि मोबाइल क्रमांकासह नोंदणी करावी. नंतर ऑनलाईन अर्ज काळजीपूर्वक भरावा कारण एकदा अर्ज सबमिट झाल्यावर त्यात कोणतीही दुरुस्ती करता येणार नाही. अर्जासोबत फोटो, स्वाक्षरी, बायोडेटा आणि शैक्षणिक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतील. अर्ज फी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI किंवा इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून ऑनलाईन भरावी लागेल. अर्ज सादर केल्यानंतर त्याची प्रिंटआउट आणि ई-Receipt भविष्यासाठी जतन करून ठेवावी. या पदाची सुरुवात करारावर आधारित असली तरी बँकेत नोकरी सुरू करण्यासाठी आणि अनुभव घेण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी [www.southindianbank.com](http://www.southindianbank.com) या वेबसाइटला भेट देऊन लवकरात लवकर अर्ज करावा. यामुळे चांगल्या पगारासह बँकिंग क्षेत्रात भविष्यात स्थिर नोकरी मिळवण्याची संधी प्राप्त होईल.