फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Success Story : देशातील लाखो विद्यार्थी जेईई (JEE) परीक्षा पास करून प्रतिष्ठित आयआयटी संस्थानांमध्ये प्रवेश मिळवतात. येथून ते स्वत:ची स्वप्ने साकार करण्यासाठी नामांकित कंपन्यांमध्ये उत्तम करिअर घडवतात. असेच एक नाव सुशांत सचदेवा यांचे आहे. ज्यांनी आयआयटी बॉम्बे (IIT Bombay) मधून बी.टेक (B.Tech) पूर्ण केल्यानंतर परदेशात आपली ओळख निर्माण केली. त्यांचे हे यश आज कित्येक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. चला तर मग जाणून घेऊया सुशांत सचदेवा यांच्या बद्दल…
सुशांत शालेय जीवनापासूनच अभ्यासात खूप हुशार होते. त्यांनी १० वी पर्यंतचे शिक्षण मुंबईतील राजहंस स्कूलमधून पूर्ण केले. तर बारावीचे शिक्षण पुण्याच्या आर्मी पब्लिक स्कूलमधून पूर्ण केले. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, सुशांत यांना २००२ मध्ये ऑस्ट्रेलियन अकॅडमीकडून सुवर्ण पदक मिळाले होते. तर भारत सरकारच्या ‘किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजने’ अंतर्गत फेलोशिपही मिळाली होती. तसेच त्यांनी २००४ मध्ये आयआयटी जेईई (IIT-JEE) परीक्षेत ‘ऑल इंडिया रँक १’ (AIR 1) मिळवली होती.
सुशांत सचदेवा यांनी आयआयटी बॉम्बेमधून बी.टेक पूर्ण केल्यानंतर परदेशात उच्च शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. २०१३ मध्ये त्यांनी अमेरिकेतील प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीमधून (Princeton University) थ्योरेटिकल कॉम्प्युटर सायन्स या विषयात डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (Ph.D.) पदवी पूर्ण केली. त्यानंतर २०११ मध्ये त्यांनी ‘मायक्रोसॉफ्ट’ कंपनीत रिसर्च इंटर्न म्हणून आपल्या कामाची सुरुवात केली. नंतर सुशांत यांनी ‘युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया’, बर्कले (UC Berkeley) येथे पोस्टडॉक्टोरल फेलो म्हणूनही काम केले.
सुशांत सचदेवा यांच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार (LinkedIn Account), ते सध्या युनिव्हर्सिटी ऑफ टोरंटोमध्ये कॉम्प्युटर सायन्सचे असोसिएट प्रोफेसर(Associate Professor) म्हणून कार्यरत आहेत. यासोबतच तंत्रज्ञान विश्वात क्रांती घडवणाऱ्या ‘ओपन एआय’(OpenAI) या नामांकित संस्थेत संशोधक म्हणून काम पाहत आहेत.






