फोटो सौजन्य - Social Media
क्रांतीज्योती Savitribai Phule यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी अभिवादनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शिक्षण क्षेत्रात सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या महान कार्याची आठवण करून देत विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न या कार्यक्रमांतून करण्यात आला. फुलंब्री येथील न्यू ओएसीस इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्येही हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
फुलंब्री येथे आयोजित कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका करुणा दांडगे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यानंतर शाळेतील निवडक विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर आधारित भाषणे सादर केली. विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनकार्याची माहिती देत स्त्री शिक्षणासाठी त्यांनी दिलेल्या संघर्षाची आठवण करून दिली.
या वेळी मुख्याध्यापिका करुणा दांडगे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, सावित्रीबाई फुले यांनी केलेले स्त्री शिक्षणाचे कार्य हे आजच्या पिढीसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. एकोणविसाव्या शतकात स्त्रियांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. त्या काळात समाजातील अनेक रूढी-परंपरा आणि विरोध यांचा सामना करत त्यांनी महिलांसाठी शिक्षणाचे दार खुले केले. त्यासाठी त्यांना अनेक अडचणी, अपमान आणि त्रास सहन करावा लागला. तरीही त्या आपल्या ध्येयापासून कधीच मागे हटल्या नाहीत.
दांडगे पुढे म्हणाल्या की, आज आपण महिलांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि विविध क्षेत्रांमध्ये यशस्वी होताना पाहतो. यामागे सावित्रीबाई फुले यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या संघर्षामुळेच महिलांना शिक्षणाची संधी मिळाली आणि त्यातून त्यांना स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवता आला. विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजासाठी सकारात्मक कार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक आणि शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये संघप्रिया पैठणे, स्वाती खोजे, स्वाती उंबरकर, सपना सोनवणे, इंदू जाधव, अश्विनी जाधव, पूनम दांडगे, प्रियांका गोरे, भाग्यश्री खिल्लारे, पूनम दाभाडे तसेच शिक्षक महादेव पाटील, प्रकाश मोटे, इमरान खान, रुपेश ठाकूर आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याविषयी माहिती देणारी भाषणे आणि विचार मांडले.
दरम्यान, ढोरकीन (ता. फुलंब्री) येथील बालानगरमधील श्री सरस्वती भुवन प्रशालेतही सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली.
यावेळी पद्माकर वाघरूळकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, भारतातील महिलांसाठी पहिली शाळा सुरू करणाऱ्या आणि देशातील पहिल्या महिला शिक्षिका व मुख्याध्यापिका म्हणून सावित्रीबाई फुले यांचे नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया घालून समाजात मोठा बदल घडवून आणला. त्यांचे कार्य आजही प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक राजेंद्र गायकवाड होते. प्रमुख पाहुणे म्हणून सुधाकर येवतीकर आणि प्रदीप ब्राह्मणकार उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सारिका तोडकर, वैशाली कुंभकर्ण आणि सुमेघा साळवे यांचा सत्कार करण्यात आला. सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित या कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांना त्यांच्या महान कार्याची माहिती मिळाली. समाजात शिक्षणाचे महत्त्व आणि स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देत या कार्यक्रमांनी उपस्थितांना प्रेरणा दिली.






