उद्यापासून सुरू होणार दहावीची परीक्षा (फोटो- istockphoto)
उद्यापासून सुरू होणार दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा
५०० मिटर अंतरावरील झेरॉक्सची दुकाने बंद
परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी कडक बंदोबस्त
सोनाजी गाढवे /पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीची परीक्षा आज पासून सुरू होत आहे. या परीक्षेसाठी राज्यातील १६ लाख १५ हजार ४८९ विद्यार्थ्यांनी (Career) नोंदणी केली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ३ हजार ८७९ विद्यार्थी वाढले आहेत. बारावी परीक्षेदरम्यान सामूहिक कॉपी प्रकरणे उघडकीस आल्याने दहावीच्या परीक्षेत गैरप्रकार रोखण्याचे राज्य मंडळासमोर आव्हान आहे.
त्यामुळे यंदा पाच हजार १११ केंद्रांवर परीक्षा होणार आहे. परीक्षेसाठी २७१ भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. गेल्या वर्षी दहावीच्या परीक्षेसाठी पाच हजार १३० परीक्षा केंद्रे होती. मात्र, गैरप्रकार आढळलेल्या केंद्रांवर केलेल्या कारवाईमुळे ३१ परीक्षा केंद्रे रद्द करण्यात आली.
SSC Exam: राज्यात उद्यापासून दहावीची परीक्षा! शासनाकडून परीक्षा पारदर्शक ठेवण्याचा प्रयत्न
राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावीची परीक्षा दि. २० फेब्रुवारी ते १८ मार्चदरम्यान होणार आहे. ‘परीक्षार्थ्यांनी नेमून दिलेल्या वेळेपूर्वी किमान अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित असणे आवश्यक आहे. सकाळच्या सत्रात १०.३० वाजता, तर दुपारच्या सत्रात २.३० वाजता विद्यार्थ्यांनी परीक्षा दालनात उपस्थित राहणे आवश्यक आहे. असे डॉ. बेडसे यांनी सांगितले.
गैरप्रकार रोखण्यासाठी कडक बंदोबस्त
बारावी परीक्षेदरम्यान सामूहिक कॉपी प्रकरणे उघडकीस आल्याने दहावीच्या परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य मंडळांनी कडक बंदोबस्त केला आहे. यंदा ५ हजार १११ केंद्रांवर परीक्षा होणार आहे. परीक्षेसाठी २७१ भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. विभागीय मंडळांमार्फत विशेष पथके नेमण्यात आली आहेत. परीक्षा केंद्रांवर बैठी पथके, पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार असल्याचे डॉ. बेडसे यांनी सांगितले.
SSC Exam 2026: विद्यार्थ्यांची ‘परीक्षा’ सुरू; ‘कॉपीमुक्त अभियान’ अन् वैद्यकीय कारणास्तव अनुपस्थित…
झेरॉक्सची दुकाने बंद
शिक्षण विभागाच्या नऊ जानेवारीच्या शासन निर्णयानुसार जिल्हा दक्षता समितीची जबाबदारी आणि कार्ये निश्चित करण्यात आली आहेत. त्यानुसार परीक्षा केंद्राच्या ५०० मीटर परिसरातील छायाप्रती काढून देणारी (फोटोकॉपी) दुकाने बंद ठेवणे, संबंधित परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करणे अशा विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
विभागीय मंडळनिहाय विद्यार्थ्यांची आकडेवारी
पुणे – २,७८,१४५
नागपूर – १,५३,८९०
छत्रपती संभाजीनगर – १,९१,१५२
मुंबई – ३,४९,८७३
कोल्हापूर – १,३२,८०८
अमरावती – १,६५,३१८
नाशिक – २,६,६३६
लातूर – १,११,८८
कोकण – २५,७७९
एकूण – १६,१५,४८९
दोन वर्षाची आकडेवारी
वर्ष २०२४-२५ – २०२५- २६
विद्यार्थी – ८,६४,१२०- ८,६५,७४०
विद्यार्थिनी- ७,४७,४७१ – ७,४१,७३६
तृतीयपंथी – १९ – १३
एकूण- १६,११,६१० – १६,१५,४८९






