धक्कादायक! भर हॉस्पिटलमध्ये विद्यार्थिनीला चाकूने भोसकल, डॉक्टरही मदतीला न आल्याने संताप
मध्य प्रदेशातील नरसिंहपूर जिल्हा रुग्णालयात एक भयंकर प्रकार समोर आला आहे. भरदिवसा डॉक्टर्स, नर्सेस आणि रुग्णांसमोर १२ वीच्या विद्यार्थिनीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फूटेज सोमवारी समोर आलं असून त्यानंतर जिल्हाभरात तणाव निर्माण झाला आहे. २७ जून रोजी दुपारी ही घटना घडली.
नाशिक हादरलं! १० रुपयांच्या वर्गणीवरून जीवघेणा हल्ला, कोयत्याने अल्पवयीन मुलावर वार
पीडित विद्यार्थिनी संध्या चौधरी नरसिंहपूरच्या पटेल वॉर्डची रहिवासी होती. ती आपल्या ओळखीच्या एका महिलेला भेटण्यासाठी जिल्हा रुग्णालयाच्या प्रसूती कक्षात आली होती. त्यानंतर ती ट्रॉमा सेंटरच्या रूम क्रमांक २२ च्या बाहेर बसलेली असताना तिच्यावर आरोपी अभिषेक कोश्टी याने धारदार शस्त्राने हल्ला केला. यात संध्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात प्रचंड घबराट पसरली आहे.
गंभीर बाब म्हणजे, घटनेच्या वेळी रुग्णालयात रुग्ण, परिचारक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते, मात्र कोणीही मध्यस्थी करण्याची हिंमत दाखवली नाही. एका नर्सिंग ऑफिसरने पोलिसांना सांगितले की, त्यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने “मध्यम पडू नको, नाहीतर तुलाही मारून टाकीन,” अशी धमकी दिली. हल्ल्यानंतर आरोपीने स्वतःवरही वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला, पण तो अपयशी ठरला. त्यानंतर तो दुचाकीवरून पळून गेला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अभिषेक कोश्टी हा घटनास्थळी दुपारपासूनच घुटमळत होता. संध्याला पाहताच त्याने तिच्याशी संवाद साधला आणि नंतर तिचा पाठलाग करत ट्रॉमा सेंटरमध्ये पोहोचला. हल्ल्यानंतर तो रुग्णालयातून सहज निसटला. विशेष म्हणजे, त्या वेळी ट्रॉमा सेंटरच्या बाहेर दोन सुरक्षा रक्षक उपस्थित होते, तरीही आरोपीला थांबवता आले नाही.
संध्याचा मृतदेह घटनास्थळी तासन्तास पडून होता. पोलिस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आणि तपास सुरु केला. घटनेची माहिती मिळताच संध्याच्या कुटुंबीयांनी जिल्हा रुग्णालयाजवळ रास्ता रोको आंदोलन केले आणि आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिल्यानंतर रात्री उशिरा आंदोलन मागे घेण्यात आले.
नरसिंहपूरचे पोलिस अधीक्षक मृगाक्षी डेका यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला घटनेनंतर अवघ्या एका तासात अटक करण्यात आली. प्राथमिक चौकशीत आरोपीने सांगितले की, तो आणि संध्या यांची ओळख दोन वर्षांपासून होती, आणि त्यांची मैत्री सोशल मीडियावरून सुरु झाली होती. मात्र जानेवारीपासून त्याने संध्यावर कोणाशी तरी प्रेमसंबंध असल्याचा संशय घेतला होता. त्यामुळेच तिने आपल्याशी ‘फसवणूक’ केल्याचे त्याने सांगितले आणि संध्याला ठार मारण्याचा व स्वतः आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचं कबूल केले.
या घटनेमुळे रुग्णालयातील सुरक्षेच्या दृष्टीनेही गंभीर प्रश्न उपस्थित करते. दिवसाढवळ्या, शेकडो लोकांच्या उपस्थितीत आणि सुरक्षारक्षक असतानाही आरोपीने अशा प्रकारे हल्ला करून पलायन केल्यामुळे रुग्णालय प्रशासनावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. या घटनेनंतर ट्रॉमा सेंटरमधील अनेक रुग्णांनी भीतीपोटी लवकर डिस्चार्ज घेण्याची मागणी केली.या हत्येमुळे राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, रुग्णालयातील सुरक्षेविषयी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून पुढील चौकशी सुरु आहे.