फटाका सायलेंसर विक्री करणाऱ्यांवर कारवाई
बारामती: बारामती वाहतूक पोलिसांनी आता फटाका बुलेटवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. असे असतानाच आता वाहतूक शाखेने फटाका सायलेंसर विक्री करणाऱ्या दुकानांवरच कारवाई करत तब्बल १६ फटाका सायलेंसर ताब्यात घेत थेट मुळावरच घाव घातला आहे. त्यामुळे सायलेंसर विक्री करणाऱ्या दुकान चालकांनी मोठा धसका घेतला आहे.
वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी गेली अनेक महिन्यांपासून वाहतूक नियमांची अंमलबजावणी करताना अनेक कारवाया करत लाखो रुपयांचा दंड वसुल केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, वाहतूक पोलीस जवान सुभाष काळे, प्रदीप काळे, अजिंक्य कदम, प्रज्योत चव्हाण, सीमा घुले, स्वाती काजळे, रेशमा काळे, रूपाली जमदाडे, माया निगडे, सीमा साबळे आदींनी केली आहे.
एकाच दिवसात ११ मोठ्या सायलेंसरवर कारवाई
फटाका सायलेंसरवर कारवाई करण्याची मोहीम सुरु असताना आज दि. १८ रोजी एका दिवसात कसबा, भिगवण चौक, नेवसे रोड, इंदापूर चौक परिसरात ११ बुलेट चालकांकडून मोठ्या आवाजाचे सायलेंसर जप्त करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे बुलेट गाड्या वापरणाऱ्या चालकांना आता सायलेंट सायलेंसर वापरावे लागणार आहेत.
1 लाखाची लाच स्वीकारणं भोवलं; बारामतीच्या नगररचनाकाराला रंगेहात पकडले
1 लाखाची लाच स्वीकारणं नगररचनाकाराला भोवलं
बारामती शहरातील बांधकाम व्यवसायाकडून गृह प्रकल्पाचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी दोन लाख रुपयांची लाचेची मागणी करून त्यातील एक लाख रुपये रकमेची लाच स्वीकारताना बारामती नगर परिषदेचे नगररचनाकार विकास किसनराव ढेकळे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडून अटक केली आहे. या कारवाईमुळे बारामती शहरात खळबळ उडाली आहे.
बारामती शहरातील औद्योगिक वसाहत परिसरातील रुई याठिकाणी निर्मिती विहार इमारत बी विंग १, या गृह प्रकल्पाचा प्रस्ताव बारामती नगर परिषदेच्या नगररचना विभागाकडे मंजुरीसाठी दाखल केलेला आहे. सदर प्रस्ताव मंजुरीसाठी नगररचनाकार विकास ढेकळे यांनी तक्रारदारांना दोन लाख रुपयांची मागणी केली होती. याबाबतची तक्रार १९ मार्च २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारदाराने केली. दरम्यान तडजोडीअंती १ लाख ७५ हजार रुपयांची मागणी नगर रचनाकार ढेकळे यांनी केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आलेल्या तक्रारीनंतर या विभागाने तक्रारीची पडताळणी केली, त्यानुसार तक्रारदाराने १ लाख ७५ हजार रुपये रकमेपैकी १ लाख रुपयांचा पहिला हप्ता देण्याचे ठरले.