गर्भवतीची चिमुकलीसह विहिरीत उडी (फोटो सौजन्य-X)
हिंगोली : पिंपळदरी येथील आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात दहावीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली. या विद्यार्थिनीने बुधवारी दुपारी ओढणीने गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना घडली. तिने टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप स्पष्ट झाले नाही. या घटनेमुळे जिल्हाभरात खळबळ उडाली आहे.
औंढा नागनाथ तालुक्यातील भोसी येथील स्वाती सुखदेव झाटे (वय १६) ही विद्यार्थिनी पिंपळदरी येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या निवासी आश्रमशाळेत शिक्षण घेते. या शाळेतच तिचा भाऊदेखील पाचवी वर्गात शिक्षण घेतो. मंगळवारी (दि.२४) स्वाती हिला तिच्या वडिलांनी शाळेत आणून सोडले होते. त्यानंतर बुधवारी सकाळीदेखील तिचे वडील तिला भेटण्यासाठी आले होते. दोघेही सुमारे पंधरा ते वीस मिनिटं बोलले.
दरम्यान, दुपारी स्वाती तिच्या मैत्रिणीसह भोजनासाठी खोलीमधून खाली आली होती. त्यानंतर अचानक तिने खोलीत जाऊन येते असे कारण सांगत ओढणीने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी मोठा आवाज झाल्याने तेथील विद्यार्थिनी व वसतिगृहाच्या अधिक्षिका घटनास्थळी धावल्या. त्यांनी खोलीत पाहिले असता स्वाती पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसून आली.
108 क्रमांकाला कळवूनही रुग्णवाहिका उशिराने
पिंपळदरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केल्यानंतर स्वातीचे ऑक्सिजन लेव्हल कमी होत होते. त्यामुळे तिला तातडीने ऑक्सिजनची सुविधा असलेल्या रुग्णवाहिकेची गरज होते. त्यानुसार 108 क्रमांकाला कळविण्यात आले होते. मात्र, एक तासानंतरही रुग्णवाहिका आलीच नाही. त्यामुळे पिंपळदरीच्या आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेनेच तिला उपचारासाठी आणावे लागले. त्यामुळेच स्वातीला जीव गमवावा लागल्याचा आरोप माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. सतिश पाचपुते यांनी केला आहे.
रुग्णालय प्रशासनाचे दुर्लक्ष
108 क्रमांकाला सदरील घटनेबाबात कळवूनही शासकीय रुग्णवाहिकेला तब्बल एक तास उशीर होणे हे अक्षम्य चुकीचे असून संबंधितांवरही कारवाई करण्याची मागणी होत आहे.
आदल्यादिवशीच वडिलांनी शाळेत आणून सोडले
मंगळवारी (दि.२४) स्वाती हिला तिच्या वडिलांनी शाळेत आणून सोडले होते. त्यानंतर बुधवारी सकाळीदेखील तिचे वडील तिला भेटण्यासाठी आले होते. पण, नंतर तिने गळफास घेतला. सर्वांनी तिला खाली उतरवून तातडीने उपचारासाठी पिंपळदरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्या ठिकाणी तिच्यावर प्राथमिक उपचार करून तिला पुढील उपचारासाठी हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले.
मुख्याध्यापकांसह शिक्षक रुग्णालयात
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी सुनील बारसे, मुख्याध्यापक अवचार यांच्यासह शिक्षक तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल झाले. याप्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत नोंद झाली नाही. मयत स्वातीच्या पश्चात आई, वडील, तीन बहिणी व भाऊ आहे. भोसी गावावर शोककळा पसरली आहे.