संग्रहित फोटो
पुणे : पुणे स्टेशन परिसरात हॉटेल कामगाराला भोसकून त्याच्याकडील रोकड लुटण्याच्या प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. गौरव भारत धोकडे (वय १९), आकाश बाळू कांबळे (वय १९, दोघे रा. लष्कर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात आत्माराम धर्मा आडे (वय ४२, रा. अशोकनगर, येरवडा, मूळ रा. आर्णे, जि. यवतमाळ) जखमी झाले आहेत. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आडे क्वीन्स गार्डनमधील एका क्लबच्या आवारातील हॉटेलमध्ये वेटर आहे. सोमवारी मध्यरात्री काम संपवून ते घरी निघाले होते. स्टेशन परिसरातील अलंकार टॉकीजजवळ ते रिक्षाची वाट पाहत थांबले होते. तेव्हा आरोपी धोकडे आणि कांबळे दुचाकीवरुन आले. त्यांनी आडे यांच्याकडे ५०० रुपये मागितले. आडे यांनी नकार दिल्यानंतर आरोपींनी त्यांच्याकडील कोयता काढून पोटाला लावला. कोयत्याने भोसकून आरोपी पसार झाले. जखमी अवस्थेतील आडे यांनी याबाबतची तक्रार पोलिसांकडे दिली. पोलिसांनी त्यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी तपास करुन पसार झालेल्या आरोपींना पकडले. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण अधिक तपास करत आहेत.
हे सुद्धा वाचा : नाताळनिमित्त पुण्यातील ‘या’ भागात वाहतूकीत बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग
दोन तरुणांवर कोयत्याने वार
गेल्या काही दिवसाखाली भरदुपारी कर्वे रस्त्यावरील प्रसिद्ध महाविद्यालय परिसरात फिल्मीस्टाईल टोळक्याने हातात कोयते घेऊन पाठलाग करत दोन तरुणांवर कोयत्याने वार केले. यात एका तरुणाची प्रकृती चिंताजनक असून, त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर, दुसऱ्याला डोक्यात वार करून जखमी केले आहे. भरदुपारी घडलेल्या याघटनेमुळे महाविद्यालय परिसरात चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. धक्कादायक म्हणजे, मैत्रिणीबद्दल अफवा पसरवतोय या संशयावरून टोळक्याने वार केले आहेत. घटनेची माहिती मिळताच परिमंडळ एकचे उपायुक्त संदिपसिंह गिल्ल व डेक्कन पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमी असलेल्या तरुणांकडे चौकशी केली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, पसार झालेल्या तरुणांचा शोध घेतला जात आहे.
राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले
राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसाखाली छत्रपती संभाजीनगरमध्ये जुन्या भांडणाच्या कारणातून 26 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. ही घटना सोमवारी (दि.2) सायंकाळी हसूल परिसरातील कारागृहाच्या बाजूच्या मैदानावर घडली. दिनेश उर्फ बबलू परमानंद मोरे (वय 26, रा. चेतनानगर, हसूल) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी अनिकेत गायकवाड व गणेश सोनवणे यांची नावे समोर आली असून, शोधासाठी चार पथके रवाना झाली. या हत्येप्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.