नववधूने सत्यनारायण पूजा होताच ठोकली धूम, गुन्हा दाखल (फोटो सौजन्य-X)
गंगाखेड : लग्न करून फसवणूक झाल्याच्या अनेक घटना आत्तापर्यंत समोर आल्या आहेत. त्यातच तालुक्यातील धारखेड येथे असाच प्रकार घडला. येथे राहणाऱ्या तरुणाची फसवणूक झाल्याचे समोर आले. रामभाऊ भालके (वय 31) असे या तरुणाचे नाव आहे. या तरुणाला लग्नाचे आमिष दाखवून आर्थिक आणि भावनिक फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे.
संबंधित तरुणाने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, लग्नाचे आमिष दाखवून ३ लाख ६६ हजार ९६० रुपयांची फसवणूक केली. नववधूने दागिन्यांसह मनमाड येथून नातेवाईक म्हणून सोबत आलेल्यांसोबत पोबारा केला. या प्रकरणी गंगाखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून घटना जळगावची असल्याने जळगाव पोलिस ठाण्यात ३ जुलै रोजी गुन्हा वर्ग करण्यात आला. तालुक्यातील धारखेड येथील फिर्यादी रामभाऊ भालके याने त्याच्या ओळखीचे भगवान बचाटे, शेषेराव चिंतलवार यांना आमच्या समाजात मुली लग्नाला मिळत नाहीत, आपण लग्नासाठी स्थळ पाहावे म्हणून सांगितले.
दरम्यान, जळगावला स्थळ असल्याचे सांगून त्याच्या मित्राने रामभाऊ भालके व नातेवाईकांना जळगाव येथील मिनाक्षी जैन यांच्याकडे नेले. त्यांनी जळगावातील मनीषा पाटील नावाच्या महिलेची मुलगी आहे म्हणून मुलगी गायत्रीला दाखवण्यात आले. मुलाने मुलगी पसंत केल्यानंतर मुलीचे आई-वडिल गरीब आहेत. मुलीच्या कुटुंबाला तीन लाख रुपये द्यावे.
तसेच सोन्याचे, चांदीचे दागिने, कपडे घेण्याची अट घातली. फिर्यादी रामभाऊ भालके याने तीन लाख रुपये दिले. याशिवाय, जळगावात सोन्याचे मनी मंगळसूत्र, कानातील सोन्याचे झुंबर, चांदीचे चेन, जोडवे व वधूकडील नातेवाईकांना कपडे घेतले. फिर्यादीच्या धारखेड येथील मोजक्याच नातेवाईकांना बोलावून २७ जून रोजी लग्न लावले. सत्यनारायण पूजा होताच त्या तरूणीने पोबारा केला. नंतर येण्याची काही चिन्हे नव्हती.
दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे कळताच रामभाऊ भालके यांनी गंगाखेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून भगवान बचाटे गंगाखेड, शेषेराव चिंतलवार नांदेड, शिवाजी वाघटकर नांदेड, मनीषा पाटील, मीनाक्षी जैन, मीना बोरसे, सुजात ठाकूर, अक्षय जोशी (सर्व रा. जळगाव) यांच्यावर लग्नाचे आमिष दाखवून संगनमत करून लग्न लावून देऊन फसवणूक केल्याची तक्रार दिली.
‘तो’ फोन आला अन्…
गायत्रीला जळगावला घेऊन या, असे म्हणून दुसऱ्या दिवशी नववधूचे नातेवाईक म्हणणारे कारने नवरदेवाच्या घरी गेले. दरम्यान, नववधू आणि नवरदेवाचे नातेवाईक जळगावला खासगी वाहनाने निघाले. रस्त्यावर मनमाड शहर लागताच नववधूच्या सोबतच्यांनी न्यायालयात काम आहे, असे सांगून नवरदेव व त्याच्या नातेवाईकांना मनमाडलाच थांबण्यास सांगितले. त्यानंतर फिर्यादी रामभाऊ भालके यांना तुझ्या सोबतच्या नातेवाईकांसह तुम्ही गंगाखेड जा, म्हणून नववधू गायत्री जैन हिला तिच्या सोबतच्या घेऊन गेले. त्यानंतर ते पुन्हा परतलेच नाही.