वैजापुरात सेवानिवृत्त सैनिकासह अनेकांची फसवणूक; शेअर मार्केटच्या नावाखाली 86 लाखांना गंडा (File Photo : Fraud)
वैजापूर : शेअर मार्केटमधील गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून माजी सैनिकासह त्यांच्या सहकाऱ्यांची ८६ लाख ७१ हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना वैजापुरात उघडकीस आली. याप्रकरणी एका महिलेसह दोन जणांविरुद्ध पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सेवानिवृत्त सैनिक संजीव शामराव मतसागर (रा. जरुळ) यांनी पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली. सचिन बाबासाहेब बडे व अश्विनी विलास खेडकर (दोघे रा. खिर्डी, तालुका पाथर्डी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे असून, सध्या ते वैजापूर शहरातील स्वामी समर्थनगर भागात राहत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या दोघांनी स्वामी एंटरप्रायझेस ही प्रायव्हेट लिमिटेड संस्था स्थापन करुन आमच्या संस्थेमध्ये शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करा व गुंतवणूक केलेल्या, पैशांवर दहा टक्के परतावा मिळवा, असे आमिष संजीव मतसागर व त्यांच्या सहकाऱ्यांना दाखवले.
या आमिषाला भुलून मतसागर व अन्य व्यक्तींनी मागील वर्षी १९ जुलै ते १० ऑक्टोबर या कालावधीत तब्बल ८६ लाख ७१ हजार रुपये गुंतवले. मात्र, आरोपींनी या रकमेवर दहा टक्के परतावा न देता तसेच मूळ रक्कम न देता फिर्यादी व अन्य व्यक्तींची आर्थिक फसवणूक केली अशी तक्रार देण्यात आली आहे. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यात वाढलंय फसवणुकीचे प्रमाण
राज्यात फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून फसणुकीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातच आता पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील मुलांना लष्करात भरती करण्याचे आमिष दाखवून प्रत्येक उमेदवाराकडून प्रत्येकी तीन लाख रुपये घेऊन लष्करात नोकरी लावतो म्हणून फसवणूक करणाऱ्या तोतया लष्करी जवानावर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिलिटरी इंटेलिजन्स आणि वन गार्डन पोलीस यांनी ही संयुक्त कारवाई केली आहे.
साताऱ्यात गुंतवणुकीच्या नावे फसवणूक
साताऱ्यात फसवणुकीची घटना समोर आली आहे. ‘आमच्याकडे स्कीममध्ये पैसे गुंतवल्यास रकमेच्या दुप्पट पैसे अथवा दुप्पट रकमेचे सोने मिळेल’, असे आमिष दाखवून 9 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. धन्यकुमार गोरख माने, शरयू धन्यकुमार माने (रा. राजगुरुनगर, सध्या रा. संगमनगर खेड) व प्रतिक्षा सिद्धार्थ गडांकुश (रा. चिंचणेर, ता. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.