संग्रहित फोटो
पुणे : राज्यात फसवणूक होण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून फसवणूकीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता सिंहगड रोड परिसरात पोलीस असल्याच्या बतावणीने महिलेचे सहा लाख रुपयांचे दागिने चोरुन नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी ४२ वर्षीय महिलेने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार दोन चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार महिला वडगाव बुद्रुक परिसरातील एका मंगल कार्यालयात आल्या होत्या. विवाह समारंभ आटोपून त्या दुपारी तीनच्या सुमारास मंगल कार्यालयातून बाहेर पडल्या. त्या वेळी दोन चोरट्यांनी त्यांना अडवले. चोरट्याने खाकी रंगाची पँट परिधान केली होती. त्यांनी महिलेकडे पोलीस असल्याची बतावणी केली. या भागात महिलांकडील दागिने चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दागिने काढून पिशवीत ठेवा, अशी बतावणी चोरट्यांनी त्यांच्याकडे केली. नंतर महिलेने पिशवीत दागिने ठेवली. पिशवीत दागिने ठेवले का नाही, याची तपासणी करण्याचा बहाणा करुन चोरट्यांनी महिलेच्या नकळत दागिने काढून घेतले. महिलेचे लक्ष नसल्याची संधी साधून चोरटे दुचाकीवरुन पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक किरण लिटे अधिक तपास करत आहेत.
हे सुद्धा वाचा : उरुळी देवाची परिसरात भीषण अपघात; टँकरच्या चाकाखाली सापडून चिमुकल्याचा मृत्यू
एटीएममधून पैसे काढून देतो म्हणून एकाची फसवणूक
पुण्यातील धनकवडी भागात एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ नागरिकाकडील एटीएम कार्डचा गैरवापर करुन चोरट्याने खात्यातून ५५ हजार रुपयांची रोकड चोरुन नेल्याची घटना घडली आहे. दरम्यान एटीएममधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना चोरट्यांनी लक्ष्य केले असल्याचे यावरून दिसत आहे. याबाबत ६७ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक आंबेगाव परिसरात राहायला आहेत. रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास ते पुणे-सातारा रस्त्यावरील एटीएम केंंद्रात रोकड काढण्यासाठी गेले होते. त्यांच्या मागोमाग चोरटा एटीएममध्ये शिरला. एटीएममधून रोकड काढणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला मदत करण्याचा बहाणा चोरट्याने केला. चोरट्याने ज्येष्ठाकडील एटीएम कार्ड आमि सांकेतिक शब्द घेतला. चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाकडील एटीएम कार्ड स्वत:कडे ठेवले. त्यानंतर चोरट्याने त्याच्याकडील कार्ड वापरुन एटीएमधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. एटीएममधून पैसे निघत नसल्याचे सांगून चोरट्याने त्याच्याकडील कार्ड ज्येष्ठाला दिले. ज्येष्ठ नागरिक तेथून गेल्यानंतर चोरलेल्या एटीएमचा गैरवापर करुन खात्यातून ५५ हजार रुपये चोरुन नेल्याचे समजले. पोलीस उपनिरीक्षक कल्पना काळे अधिक तपास करत आहेत.