संग्रहित फोटो
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुक केल्यानंतर चांगला नफा मिळेल असे आमिष दाखवून दाम्पत्याने बांधकाम ठेकेदाराची दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी एका दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला. याप्रकरणी ज्ञानेश्वरी अमर बिरादार आणि अमर बिरादार यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत ५० वर्षीय बांधकाम ठेकेदाराने कोथरूड पोलिसांत तक्रार दिली आहे.
तक्रारदार पौड रोडवर राहतात. पोलिसांच्या माहितीनुसार, बिरादार दाम्पत्याशी बांधकाम ठेकेदाराची २०१९ मध्ये ओैंध भागातील कार्यक्रमात ओळख झाली होती. नंतर आरोपींशी त्यांचा परिचय वाढला. शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात इन्कोफिना कन्स्टलिंग कंपनी सुरू केली असल्याचे बिरादार दाम्पत्याने त्यांना सांगितले. कंपनीत दहा लाख रुपये गुंतविले तर दरमहा अडीच ते चार टक्के परतावा मिळेल, तसेच मूळ रक्कम अडीच वर्षात परत मिळेल, असे आमिष दाखविले. नंतर ठेकेदाराने बिरादार दाम्पत्याकडे गुंतवणूक करण्यास काही रक्कम दिली. त्यांनी ठेकेदाराला परतावा दिला. परतावा मिळाल्याने त्यांचा विश्वास बसला.
नंतर ठेकेदाराचा भाचा, पती यांनी बिरादार दाम्पत्याकडे गुंतवणूक करण्यास रक्कम दिली. त्यावेळी आरोपींनी दरमहा सहा टक्के परतावा देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर ठेकेदारांनी वडील आणि आईच्या नावे आणखी रक्कम गुंतविली. त्यानंतर त्यांनी ठरल्याप्रमाणे परताव्याची रक्कम दिली नाही. रक्कम कमी प्रमाणात मिळाल्याने ठेकेदाराला संशय आला. त्यांनी बिरादार यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा बिरादार दाम्पत्याने कार्यालय अन्यत्र स्थलांतरित केल्याची माहिती मिळाली. चौकशीत बिरादार दाम्पत्याने अनेकांची फसवणूक केल्याची माहिती मिळाली. त्यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. तक्रार अर्जाची चौकशी करण्यात आली.
बिरादार दाम्पत्याने इन्फोफिना कन्सल्टंट कंपनीत गुंतवणुकीच्या आमिषाने अनेकांची फसवणूक केल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणात गुन्हा दाखल केला असून, चौकशी सुरू आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांनी सांगितले.