संग्रहित फोटो
सोलापूर : राज्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून अपघाताच्या घटना उघडकीस येत असतात. अशातच आता सोलापूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सोलापूरहून तडवळच्या दिशेने जाताना हत्तूर शिवारातील नाईकवाडी यांच्या शेताजवळ कार उलटून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारखाली सापडून डॉक्टरचा मृत्यू झाला आहे. हा अपघात रविवारी मध्यरात्री झाला आहे.
आशिष इरण्णा पनशेट्टी (वय ४०, रा. तडवळ, ता. अक्कलकोट) असे अपघातात मरण पावलेल्या डॉक्टरचे नाव आहे. डॉ. आशिष हे रविवारी मिटींगकरिता सोलापुरात आले होते. तेथील मिटींग संपल्यानंतर ते आसरा चौक परिसरात राहत असलेल्या बहिणीच्या घरी काही वेळ थांबले. त्यानंतर रात्री उशिरा ते तडवळ गावाकडे जाण्यासाठी सोलापुरातून कार (एमएच १३ सीएस ०३०८) चालवित निघाले होते. हत्तूर शिवारातून जात असताना, नाईकवाडी यांच्या शेताजवळ त्यांची कार बाजूच्या शेतात पलटी झाली. यात डॉ. आशिष हे कारखाली सापडले होते. सोमवारी सकाळी ६.३० च्या सुमारास तेथून जाणाऱ्या एका व्यक्तीचे याकडे लक्ष गेले. त्या व्यक्तीने ही माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर त्यांना कार उचलून बाहेर काढण्यात आले.
गंभीर जखमी अवस्थेत आशिष यांना उपचाराकरिता हवालदार घुगे यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच ते मरण पावल्याचे डॉक्टरांनी घोषित केल्याची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे. दरम्यान, त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई-वडील व भाऊ असा परिवार आहे.
हे सुद्धा वाचा : पुण्यात चोरट्यांनी वाईन शॉपी फोडली; रोकडसह विदेशी दारूच्या बाटल्यांची चोरी
भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक
खेड तालुक्यातील खालूंब्रे परिसरात सोमवारी (दि. १४) सकाळी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील सहप्रवाशाचा मृत्यू झाला असून, दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. कामावर जाण्यासाठी लिफ्ट घेतलेल्या तरुणाचा हा प्रवास दुर्दैवाने अखेरचा ठरला आहे. गजानन बाबुराव बोलकेकर (वय २६, रा. नांदेड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर आदित्य गजाननराव गायकवाड (वय २३, रा. येलवाडी, ता. खेड) हा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची नोंद महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, विजय शंकरराव तंतरपाले (वय २४, रा. चाकण) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. मोहम्मद अरमान कमरुद्दीन खान (वय ३०, रा. धारावी, मुंबई) असे गुन्हा दाखल झालेल्या कंटेनर चालकाचे नाव आहे.