संग्रहित फोटो
वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील विसापूर किल्ला परिसरात आई- वडिलांसोबत फिरण्यासाठी आलेल्या पाच वर्षाच्या चिमुकलीवर बंदोबस्तावर असलेल्या पोलिसाने लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून आडोशाला नेऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी संबंधित पोलिसाला अटक केली आहे. ही धक्कादायक घटना बुधवारी (दि. 25) घडली. सचिन वसंत सस्ते असे अटक केलेल्या आरोपी पोलिसाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाताळनिमित्त मावळ तालुक्यातील पर्यटन स्थळांवर पोलिसांकडून अधिकचा बंदोबस्त लावण्यात आला होता. पर्यटन स्थळावर सुट्टीच्या अनुषंगाने लोक फिरण्यासाठी येतात. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता. लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या विसापूर किल्ल्यावर पुणे ग्रामीण मुख्यालय येथून अधिकचा बंदोबस्त मागविण्यात आला होता. त्यामध्ये पोलीस सचिन सस्ते हा देखील विसापूर किल्ला परिसरात बंदोबस्तावर होता.
विसापूर किल्ला पाहण्यासाठी पाच वर्षीय चिमुकली तिच्या आई- वडिलांसोबत आली होती. त्या चिमुकलीला सचिन सस्ते याने चॉकलेटचा आमिष दाखवले आणि आडोशाला नेले. तिथे तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार मुलीने आपल्या पालकांना सांगितला. पालकांनी तात्काळ पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केला. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी पोलीस सचिन सस्ते याला अटक केली आहे. पोलिसाकडून कृत्ये झाल्याने रक्षकच झाले भक्षक यामुळे सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.
हे सुद्धा वाचा : पुण्यात भीषण अपघात; मद्यधुंद कार चालकाची 5 वाहनांना धडक
आरोपी पोलीस मद्यधुंद
विसापूर किल्ल्याच्या पायथ्याला हा प्रकार घडला. कर्तव्यावर असताना हा पोलीस दारूच्या नशेत होता, याचं नशेत त्याने पाच वर्षीय चिमुरडीसोबत अश्लील चाळे केलेत. याप्रकरणी सचिन सस्तेला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. नाताळची सुट्टी असल्यानं पर्यटक विसापूर किल्ल्यावर गर्दी करत होते. म्हणून नराधम पोलीस सस्ते तिथं बंदोबस्तावर होता.
राज्यात अत्याचाराचे प्रमाण वाढले
राज्यात अत्याचाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. गेल्या काही दिवसाखाली फेसबुकवर झालेली ओळख एका महिलेला चांगलीच महागात पडली. ओळखीचा फायदा घेऊन या विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर तरूणाने अत्याचार केला. आरोपीने महिलेला घटस्फोट झाल्यानंतर ‘तुझ्यासोबत लग्न करेल’, असे आमिष दाखवून अत्याचार केला. याबाबत खामगाव शहर पोलिसांनी तरुणाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. खामगाव सनी पॅलेसस्थित आशिष गीते (वय 26) याने एका 24 वर्षीय विवाहितेचा फेसबुकवरील ओळखीचा फायदा घेत तिला बोलाविले व तिला मोटरसायकलवर बसवून शेगाव रोडने सनशाईन कॅफेवर नेले. त्या ठिकाणी तुझ्यासोबत फारकती झाल्यानंतर लग्न करेन, असे आश्वासन देऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या प्रकारानंतर ‘तू माझ्यासोबत फोनवर बोलू नको’, असे म्हणून पीडित विवाहितेचा नंबर ब्लॉकमध्ये टाकला. अशा तक्रारीवरून आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे.