संग्रहित फोटो
पिंपरी : पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील बापदेव महाराज ब्रिजवर एका कार चालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून बेजबाबदारपणे कार रिव्हर्स घेतल्याने झालेल्या भीषण अपघातात एका १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला, तर तिचे काका-काकू गंभीर जखमी झाले आहेत. ही धक्कादायक घटना मंगळवारी (१९ मे) सायंकाळी ४:३० वाजण्याच्या सुमारास स्वामी हॉटेलसमोरील हायवे रोडवर घडली आहे.
स्वरा धावडे (वय १० वर्ष) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. या प्रकरणात अमित बाळकृष्ण धावडे (वय ४७, भिवंडी, ठाणे; मूळ गाव- नांदगाव पाली, सुधागड, रायगड) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पजेरो स्पोर्ट कार (एमएच 43/एएन 9567) चालक प्रशांत यशवंत म्हात्रे (वय ४५, वाशी, पेन, रायगड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कार चालकाने कोणतेही पार्किंग सिग्नल न देता किंवा पाठीमागून येणाऱ्या वाहनांना इशारा देण्यासाठी कोणालाही उभे न करता निष्काळजीपणे कार रिव्हर्स घेतली. या कारच्या धडकेत फिर्यादीचा भाऊ जयवंत यांच्या डोक्याला व चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली, तर वहिनी जयश्री यांच्या डोक्याला मार लागून डाव्या पायाला फॅक्चर झाले. तसेच त्यांची पुतणी स्वरा हिच्या डोक्याला व छातीला गंभीर दुखापत झाल्याने ती या अपघातात मृत्युमुखी पडली. या अपघातात फिर्यादीच्या भावाची होंडा ऍक्टीव्हा दुचाकी (एमएच 05/डीटी 2832) आणि आरोपीच्या कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. रावेत पोलीस तपास करीत आहेत.
हे सुद्धा वाचा : रेणापूर परिसरात खळबळ! शेतजमिनीच्या वादातून एकाचा खून; 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पीएमपीएमएल बसच्या धडकेत सफाई कामगाराचा मृत्यू
राज्यात अपघाताच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, पौड रोड परिसरात गेल्या १५ वर्षांपासून घंटागाडीवर कचरा वेचक म्हणून कार्यरत असलेले मोहन पाराजी जगधने (वय ४३, रा. गोसावी वस्ती, कर्वेनगर, कोथरूड) यांचा पीएमपीएमएल बसच्या धडकेत झालेल्या गंभीर अपघातानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे कचरा वेचकांच्या सुरक्षिततेचा आणि सामाजिक संरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.






