संग्रहित फोटो
पुणे : पुणे शहरात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. बंद फ्लॅट तसेच दुकाने देखील फोडली जात असून, लष्कर पोलिसांच्या पथकाने दुकान फोडणाऱ्या दोघांना सापळा रचून जेरबंद केले आहे. तांत्रिक तपासावरून आरोपी पकडले गेले आहेत. आरोपींकडून चोरीतील १ लाख ६५ हजार १०० रुपये रोख तसेच गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी असा एकूण २ लाख ५८ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
लष्कर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढला. त्यानुसार अभिषेक रामकुमार यादव (वय २९, रा. गांधीग्राम, मार्केटयार्ड) आणि सचिन प्रताप परिहार (वय २०, रा. बिबवेवाडी) यांना ३ जुलै रोजी अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस उपायुक्त रजनीश विभवरे व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली लष्कर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गजानन चोरमले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल घाडगे व तपास पथकाने केली.
पुणे शहरात घरफोडीच्या घटना सातत्याने होत आहेत. बंद फ्लॅट किंवा दुकान हेरगिरीकरून फोडले जात आहेत. सलग गेल्या काही दिवसापासून वेगवेगळ्या भागात अश्या मोठ्या घटना घडल्या आहेत. दरम्यान रोपींनी दुकानाचे शटर उचकून आत प्रवेश करून कॅश काउंटरमधील १ लाख ६० हजार रुपये चोरल्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांच्या ताब्यातून चोरीतील १ लाख ६५ हजार १०० रुपये रोख आणि १ लाख २० हजार रुपयांच्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या. अटकेनंतर आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती. त्यानंतर त्यांची येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
हे सुद्धा वाचा : मावळमध्ये मुसळधार पावसाचा कहर, जनजीवन विस्कळीत; महामार्ग व रेल्वे वाहतूक ठप्प






