प्रेयसीचा गळा दाबून विवाहित प्रियकराने केला खून; पत्नीचीही मिळाली साथ अन्...
अमरावती : एका विवाहित तरुणाने आपल्या प्रेयसीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना चांदूर रेल्वे शहरात घडली. त्यानंतर या तरुणाने मृतदेह रेल्वे रुळावर ठेवून अपघाताचा बनाव केला. याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून तपास केला जात आहे.
पूजा सूरज उके (वय २५, रा. डांगरीपुरा, चांदूर रेल्वे) असे खून झालेल्या प्रेयसीचे नाव आहे. ही धक्कादायक घटना गुरुवारी (दि. १६) समोर आली. याप्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने आरोपी शुभम विठ्ठलराव हटवार (वय २८, रा. डांगरीपुरा, चांदूर रेल्वे) याला अटक केली आहे. बुधवारी (दि. १५) मध्यरात्री शुभमने पूजाला आपल्या घरी बोलावले. त्याच घरात शुभम आणि त्याची पत्नी दोघांनी मिळून पूजाचा गळा दोरीने आवळून खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह पोत्यात बांधून दुचाकीवर टाकला आणि पहाटे रेल्वे पुलाजवळ नेऊन रुळांवर ठेवला.
हेदेखील वाचा : Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगर हादरलं! किरकोळ वादातून तरुणाचा धारदार शस्त्राने खून, २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू
दरम्यान, थोड्याच वेळात रेल्वे गेल्याने पूजाच्या शरीराचे तुकडे झाले. सकाळी रेल्वे पुलाजवळ मृतदेहाचे तुकडे आढळले. त्यानंतर रेल्वे स्टेशन परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी शुभम हटवार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचाही पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.
पत्नीच्या मदतीने केली हत्या
शुभम आणि पूजामध्ये अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघांचेही लग्न झाले होते. पूजाचे पतीशी पटत नसल्याने ती माहेरी राहत होती, ती शुभमला सतत लग्नासाठी तगादा लावत होती. शुभम या दबावाने त्रस्त झाला आणि शेवटी त्याने तिचा खून करण्याचा निर्णय घेतला. प्रथम पोलिसांना ही घटना आत्महत्या वाटली. परंतु, डॉक्टरांनी शवविच्छेदनात गळा आवळल्याचे व्रण असल्याचे सांगितले.
संभाजीनगरमध्ये तरुणाची हत्या
दुसऱ्या एका घटनेत, किरकोळ कारणावरून एका २५ वर्षीय तरुणावर धारदार शास्त्राने वार करत हत्या करण्यात आली. शुभम रणवीर सिंह राजपुत असे मृत तरुणाचे नाव आहे. गल्लीत अपरात्री आलेल्या तरुणाला हटकल्याचा राग मनात धरून मुख्य आरोपीने इतर तरुणांना गोळा करत तरुणाला धारधार शस्त्राने हल्ला करत संपवले. पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून दोन आरोपी फरार आहेत. ही घटना संभाजीनगरच्या कन्नडमध्ये नागद गावात मंगळवारी रात्री साडे आठच्या सुमारास घडली.