दलापूर माजी नगरसेवक हत्या प्रकरणात कोर्टाचा दणका; राऊतसह ४ जणांना जन्मठेप
पुणे : विमा नसलेल्या स्कूलबसमधून विद्यार्थ्यांची ने-आण करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततकडे दुर्लक्ष करणाऱ्या आणि त्यांची सुरक्षितता धोक्यात आणणाऱ्या चालकाला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमृत बिराजदार यांनी ३ दिवसांचा साधा कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. शालेय विद्यार्थ्यांना त्यांचे पालक सुरक्षिततेच्या विश्वासाने चालकाकडे सोपवितात. मात्र, आरोपीने या मुलांची काळजी घेण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे त्याचा गुन्हा खऱ्या अर्थाने समाजविघातक आहे, असे न्यायालयाने नमूद केले आहे.
शंकर मारुती मानकर (रा. तानाजीनगर, आंबेगाव) असे शिक्षा झालेल्या स्कूल बस चालकाचे नाव आहे. याबाबत सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत रामराजे भोसले यांनी तक्रार दिली होती. हा प्रकार २४ जून २०२३ रोजी उघडकीस आला. आरोपीने स्कूलबसचा विमा काढला नसल्याची बाब ‘आरटीओ’ अधिकाऱ्यांच्या तपासणीत उघड झाली. त्यामुळे आरोपीविरोधात मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आरोपीला न्यायालयात हजर केले असता, त्याने गुन्ह्याची कबुली देत शिक्षेऐवजी दंड ठोठावा, अशी विनंती केली. सरकारी वकील वर्षाराणी जाधव यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले. आरोपीने स्कूलबसमधून लहान शाळकरी मुलांची वाहतूक करत असताना त्यांची काळजी घेण्यास अनास्था दाखवली. यामुळे हा गुन्हा केवळ तांत्रिक स्वरूपाचा नाही. तो समाजविघातक आहे. आरोपीचे वय व त्यावरील कुटुंबीयांचे अवलंबित्व लक्षात घेतानाच, अशा चुकीच्या कृत्यांना रोखण्यासाठी समाजात संदेश देण्याच्या उद्देशाने शिक्षा देणे आवश्यक आहे, असा युक्तिवाद सरकारी वकील वर्षाराणी जाधव यांनी केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यावर न्यायालयाने आरोपीला तीन दिवस कारावास व दंड ठोठावला. दंडाची रक्कम न भरल्यास दहा दिवसांचा कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने निकालात नमूद केले आहे.