संग्रहित फोटो
पुणे : राज्यात आत्मत्येचे प्रमाण वाढले आहे. दररोज राज्यातील विविध भागातून आत्महत्या केल्याच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पत्नी व तिच्या मित्राच्या होणाऱ्या सततच्या त्रासातून एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाना पेठेत घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अतुल मारुती कदम (वय ३९, रा. बालाजी काॅम्प्लेक्स, पिंपरी चौक, नाना पेठ) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. अतुल यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन पत्नी सोनाली अतुल कदम (वय ३१, रा. साडेसतरानळी, हडपसर), तसेच तिचा मित्र कृष्णा शिंदे (रा. हडपसर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अतुल यांची आई माधुरी मारुती कदम (वय ६१) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, अतुल आणि सोनाली यांचा २०१५ मध्ये विवाह झाला होता. विवाहानंतर त्यांच्यात वाद सुरू झाले. दरम्यान, अतुलला पत्नी सोनाली हिचे कृष्णा शिंदे याच्याशी मैत्रीपुर्ण संबंध असल्याची माहिती मिळाली. या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला. वादामुळे सोनाली वेगळी राहायला लागली. ती माहेरी निघून गेली. त्यानंतर सोनाली आणि तिचा मित्र कृष्णा यांनी अतुलला त्रास देण्यास सुरुवात केली. त्याच्या मोबाइलवर संपर्क साधून धमकाविण्यात आले. पत्नी आणि तिच्या मित्राच्या त्रासामुळे अतुल यांनी गेल्या महिन्यात १५ जून रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पत्नी आणि तिच्या मित्राने दिलेल्या त्रासामुळे मुलगा अतुलने आत्महत्या केल्याचे आई माधुरी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे. सहायक निरीक्षक शेंडगे अधिक तपास करत आहेत.
हे सुद्धा वाचा : विना नंबरप्लेटच्या दुचाकीवरून अंमली पदार्थ विक्री; पोलिसांनी एकाला सापळा रचून पकडले
पुण्यात पोलीस शिपायाची आत्महत्या
पुणे शहर पोलीस दलातील पोलीस शिपायाने राहत्या खोलीत टॉवेलने गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. त्याचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. स्वारगेट पोलीस वसाहतीत ही घटना घडली आहे. स्वरूप विष्णू जाधव (वय २८, रा. स्वारगेट पोलिस वसाहत) असे आत्महत्या केलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. याप्रकरणी खडक पोलिसांत घटनेची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वरूप मूळचा कोल्हापूरमधील होता. तो अविवाहित होता. शहर पोलिसांत पोलीस शिपाई म्हणून काही वर्षांपुर्वी भरती झाला होता. पोलीस मुख्यालयात तो ‘ए’ कंपनीत नेमणूकीला होता. तो मित्रासोबत स्वारगेट पोलिस वसाहतीत बिल्डींग क्रमांक सहामध्ये राहत होता. दरम्यान, सोमवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास तो खोलीवर असताना त्याने हॉलमधील खिडकीच्या अँगलला टॉवेलने गळफास घेतल्याचे दिसून आले. लागलीच याची माहिती खडक पोलिसांना देण्यात आली. तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याच्याजवळ सुसाईड नोट मिळालेली नाही. त्याचा मोबाईल जप्त केला आहे, असे खडक पोलिसांनी सांगितले.