संग्रहित फोटो
नारायणगाव : जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील शिरोली सुलतानपूर येथील जगदाळे मळा येथील वृद्ध दाम्पत्याला मारहाण करुन दहा ते बारा तोळे सोन्याचे दागिने व रोख एक लाख वीस हजार रुपयांची रक्कम अज्ञातांनी लंपास केली आहे. ही घटना सोमवार (३० डिसेंबर) रोजी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घडली. जखमी वृद्ध दाम्पत्यावर नारायणगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून कानातील दागिने चोरट्यांनी ओरबडून नेले आहेत. डोक्याला जबर मारहाण लागल्याने त्यांना डोक्याला बारा व कानाला बारा टाके पडले आहेत. जिजाबाई तुकाराम आतकरी (वय ६५) असे जखमीचे नाव आहे.
याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी, शिरोली सुलतानपूर येथील जगदाळे मळ्यात तुकाराम गणपत आतकरी (वय ७२) व त्यांची पत्नी जिजाबाई तुकाराम आतकरी (वय ६५) हे दोघेच बंगल्यात राहतात. अज्ञाताने त्यांच्यावर पाळत ठेवून सोमवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास किचनच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. लाकडी दांडक्याने दोघांना जबर मारहाण केली. दरम्यान महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावून घेतले. तसेच कानातील दागिने निघत नसल्यामुळे अक्षरश: ते ओरबडून काढल्याने दोन्ही कानांना जखम झाली आहे. वृद्धेच्या हातातील सोन्याची अंगठी तसेच लॉकरमधील दागिने, रोख रक्कम एक लाख वीस हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले. चोरट्यांनी एक लाख वीस हजार रुपये रोख व १२ तोळे सोन्याचे दागिने लंपास करून पोबारा केला.
हे सुद्धा वाचा : रोजगारासाठी चौघं पुण्यात आले अन् रिक्षाचालकांनी ‘झटका’च दिला; काय आहे प्रकरण? वाचाच
जबर मारहाण केल्याने दोघेही पडले बेशुद्ध
दरम्यान वृद्ध दाम्पत्याला जबर मारहाण केल्याने काही काळ ते दोघेही बेशुद्ध पडले होते. काही वेळाने तुकाराम आतकरी शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी शेजाऱ्यांना फोन करून घडलेला प्रकार सांगितला. यानंतर शेजारी घटनास्थळी दाखल झाले. याबाबतची माहिती नारायणगाव पोलिसात दिल्याने काही वेळातच नारायणगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव शेलार घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून श्वान पथकास व ठसे घेण्यासाठी फिंगरप्रिंट एक्सपर्ट यांना पाचारण केले होते. या जबरी चोरीचा गुन्हा नारायणगाव पोलिसात दाखल झाला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जे. आय. पाटील करीत आहेत.