संग्रहित फोटो
सोलापूर : पंढरपुरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पंढरपूर शहरातील छत्रपती शिवाजी चौक परिसरामध्ये सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास एकाने कोयत्याने हल्ला करुन सुभाष निमकर नावाच्या व्यक्तीला जखमी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जुन्या भाडंणाच्या कारणावरुन दाळे गल्ली येथील रहिवासी अमित वाठारकरने हल्ला करुन सुभाष निमकरवर कोयत्याने वार करुन गंभीर दुखापत केली. घटना घडत असताना छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे कार्यरत असलेले वाहतूक पोलीस नदाफ आणि खटकळे यांनी धावत जाऊन हल्लेखाराला अटक केली आहे. वाहतूक पोलीसानी तत्परता दाखवल्याने जखमीचे प्राण वाचले.
हल्लेखोर अमित वाठारकर हल्ला करत असताना वाहतूक पोलीस हल्लेखोराला पकडण्यासाठी प्रयत्न करत असताना जमलेल्या लोकाना आरोपीस पकडण्यासाठी मदतीस या म्हणत असताना जमलेल्या लोकानी फक्त बघ्याची भुमिका घेतली होती. कोणीही पुढे सरसावला नाही, अशा घटनाप्रसंगी सर्वसामान्य लोक फक्त बघ्याची भूमिका घेतात हे या घटनेवरुन सिद्ध होत आहे. वाहतूक पोलीसानी जखमी निमकरला पुढील उपचारासाठी रवाना केले आहे.
पंढरपूर शहरात पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण निर्माण होते की काय अशी शंका जनतेच्या मनात निर्माण होत आहे. वहातूक पोलीस नदाफ व खटकाळे यांचे शहरात कौतुक होत आहे.
हे सुद्धा वाचा : अपघात की घातपात? आईला परत येतो म्हणून सांगून गेला अन्…
राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले
राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसाखाली छत्रपती संभाजीनगरमध्ये जुन्या भांडणाच्या कारणातून 26 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. ही घटना सोमवारी (दि.2) सायंकाळी हसूल परिसरातील कारागृहाच्या बाजूच्या मैदानावर घडली. दिनेश उर्फ बबलू परमानंद मोरे (वय 26, रा. चेतनानगर, हसूल) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी अनिकेत गायकवाड व गणेश सोनवणे यांची नावे समोर आली असून, शोधासाठी चार पथके रवाना झाली. या हत्येप्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दगडाने ठेचून मुलाचा खून
दरम्यान गेल्या काही दिवसाखाली नगर रस्त्यावरील वाघोली भागात वाघेश्वरनगर येथे एका अल्पवयीन मुलाचा लोखंडी रॉड तसेच दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीला बोलत असल्याच्या रागातून हा खून झाल्याचे सांगण्यात आले आहे. प्रेमप्रकरणातून खून झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. गणेश वाघू तांडे (१७) असे हत्या झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. याप्रकरणी लक्ष्मण पेटकर (वय ६०), नितीन पेटकर (वय ३१) आणि सुधीर पेटकर (वय ३२) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास घडली आहे.