संग्रहित फोटो
शिक्रापूर : राज्यात गुन्हेगारी वाढली असून, दररोज खून, मारामाऱ्या, दरोडे अशा घटना घडत असतात. शिरुर तालुक्यातून एक मारहाणीची घटना उघडकीस आली आहे. शिरुर शहरातील बाबूराव नगरमध्ये राहणाऱ्या एका तरुणाला गणपती मंडळाच्या वादातून लाकडी दांडके आणि फरशीच्या तुकड्याने मारहाण केल्याची घटना सिद्धार्थनगर परिसरात घडली आहे. याप्रकरणी चौघांविरोधात शिरुर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
सुरज शशिकांत चव्हाण (वय ३०, रा. बाबूरावनगर, शिरुर) हे मित्रांकडे गेले असताना, सिद्धार्थनगर येथे आकाश शंकर पवार, सागर शंकर पवार, निलेश धोत्रे, राजू शेवाळे व इतर काही युवक बसलेले होते. यावेळी आकाश पवार याने “तू आमच्या गणपती मंडळात कशाला येतोस?” असे म्हणत सुरजला शिवीगाळ व दमदाटी केली. यानंतर सागर पवार, निलेश धोत्रे आणि इतरांनी मिळून सुरजला पकडले व लाकडी दांडके तसेच फरशीच्या तुकड्याने मारहाण केली.
या हल्ल्यात सुरज गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी सुरज चव्हाण यांनी शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी आकाश पवार, सागर पवार, निलेश धोत्रे व राजू शेवाळे (सर्व रा. शिरुर, ता. शिरुर, जि. पुणे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण करीत आहेत.
हे सुद्धा वाचा : अभिनेत्री बिजलानींचा बंद बंगला फोडला; चोरटे खिडकीतून आत शिरले अन्…
लोखंडी हत्याराने वार करून तरुणाला संपवल
कानाखाली मारल्याच्या रागातून १९ वर्षीय तरुणाचा लोखंडी धारदार हत्याराने वार करून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही धक्कादायक घटना आंबेगाव पठार भागात घडली आहे. खून करून पसार झालेल्या आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक केली आहे. धैर्यशील उर्फ सचिन बळीराम मोरे (२३, रा. तीन हत्ती चौक, आंबेगाव पठार) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर, खून झालेल्या तरुणाचे नाव आर्यन उर्फ निखील अशोक सावळे (१९) आहे. खून झाल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत आरोपी धैर्यशील मोरे याचा शोध घेतला. त्यानुसार, आंबेगाव पठार येथील चिंतामणी शाळेसमोरून आरोपीचा पाठलाग करून त्याला अटक करण्यात आली. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून, ‘कानशिलात मारल्याचा राग मनात धरला होता,’ असे त्याने सांगितले.