सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. वाहतूक पोलिसांवरील हल्ले पुन्हा वाढले असून, एका तरुणाने मध्यंतरी वाहतूक पोलिसाच्या कानशिलात मारली असल्याची घटना घडलेली असताना आता पुन्हा एकदा वाहतूक नियमन व कारवाई करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या डोक्यात दुचाकीस्वार तरुणाने दगड घातल्याची घटना घडली आहे. फुरसुंगीतील भेकराईनगर चौकात गुरूवारी सायंकाळी ही घटना घडली आहे.
पोलीस हवालदार राजेश गणपत नाईक (वय ४७) गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलीस हवालदार राजेश नाईक फुरसुंगी वाहतूक विभागात कार्यरत आहेत. गुरुवारी सायंकाळी भेकराईनगर चौकात वाहतूक नियमाचे कर्तव्य करत होते. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास दुचाकीवर जाणारा व्यक्ती फोनवर बोलत दुचाकी चालवत होता. नाईक यांनी त्याला गाडी चालवताना फोनवर बोलू नको असे सांगितले. याचा राग आल्याने त्यांनी नाईक यांना शिवीगाळ करत वाद घातला. वाद इतका विकोपाला गेला की तरुणाने दुचाकी थांबवून त्यांच्याशी वाद घातला. तर हमरी-तुमरीवर येऊन रस्त्याच्या बाजूला पडलेला दगड उचलून त्यांच्या डोक्यात घातला. अचानक झालेल्या हल्ल्यात राजेश हे गंभीर जखमी झाले.
हल्ला करून फरार झालेल्या दुचाकी चालकाचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान, गेल्या महिन्यात देखील एका वाहतूक पोलिसाच्या कानशिलात मारल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. नंतर या तरुणाचा देखील पोलिसांनी योग्य बंदोबस्त करत त्याचा व्हिडीओ सोशल मिडीयात व्हायरल केला होता.
हे सुद्धा वाचा : मावळ हादरलं! लाथाबुक्क्यांनी अन् काठीने मारहाण करुन एकाचा खून; कारणही आलं समोर
जेलमधून बाहेर आला अन् तिघांना तोडला
गेल्या काही दिवसाखाली कारागृहात राहून आलेल्या सराईत गुन्हेगार व त्याच्या साथीदारांनी तीन तरुणांवर किरकोळ वादातून तीक्ष्ण शस्त्राने वार करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना मुंढवा परिसरात घडली. एक महिन्यापुर्वीच सराईत कारागृहातून बाहेर आला होता. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात महेश गजसिंह उर्फ दाद्या उर्फ डी याच्यासह दोन ते तीन अनोळखी साथीदारांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या हल्यात अजय हनुमंत पवार (वय ३१), अमित राजेश परदेशी (वय २६) व सोहेश अलमले (वय २६) हे तिघे जखमी झाले आहेत. याबाबत तुषार मेमाणे (वय २८) यांनी तक्रार दिली आहे.