मालेगावी तिघांकडून तरुणाचा निर्घृण खून (संग्रहित फोटो)
मालेगाव : पूर्ववैमनस्यातून कुरापत काढून तिघा जणांनी मनपा कंत्राटी कर्मचारी असलेल्या नितीन उर्फ रितीक अर्जुन निकम (वय २५, रा. जयभीमनगर, आयशानगर) याच्यावर हल्ला केला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. लाकडी दांडक्याने व चाकूने हल्ला करून तसेच चेहरा दगडाने ठेचून निर्घृणपणे खून केल्याचा प्रकार समोर आला. ही घटना शुक्रवारी (दि.१) मध्यरात्री जुना आग्रारोडवरील एका शोरूमजवळ घडली.
याप्रकरणी छावणी पोलिसांनी संशयित आरोपी सचिन अहिरे उर्फ सच्या माया याला अवघ्या काही तासात अटक केली असून, अन्य दोन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी मृत तरुणाचा भाऊ विशाल अर्जुन निकम यांनी फिर्याद दिली आहे. विशालचा भाऊ नितीन याला सचिन अहिरे व अन्य अल्पवयीन संशयितांनी जुन्या भांडणाची कुरापत काढून लाकडी दांडक्याने मारहाण केली. धारदार चाकूने गंभीर वार केले.
हेदेखील वाचा : Sangli Crime News: सांगली हादरली! कुख्यात गुंड्याचा पाठलाग करून खून, मानेवर आणि डोक्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा वार करत हत्या…
तसेच चेहऱ्यावर दगड टाकून जीवे ठार मारल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या खुनाची थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.
गुन्हेगारीच्या घटनांमध्ये होतीये वाढ
गेल्या काही दिवसांपासून शहरात गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. खून, खुनाचा प्रयत्न, घरफोडी, चोऱ्यामाऱ्या सर्रासपणे होत आहेत. त्यामुळे पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नागपुरात तरुणाची हत्या
गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या (Crime) घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारखे गुन्हे घडत आहेत. असे असताना नागपुरात पूर्ववैमनस्यातून चार आरोपींनी एका तरुणाची चाकूने सपासप वार करत निर्घृण हत्या केली. हर्षल अनिल सौदागर (वय 26, रा. लाल शाळेजवळ, लकडगंज) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून चारही आरोपींना अटक केली आहे.