लाच घेताना पोलिसाला अटक (फोटो- istockphoto)
पिंपरी: दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी तसेच गुन्ह्यात जप्त केलेले वाहन सोडविण्यासाठी ३० हजारांची लाच स्वीकारताना पोलिस उपनिरीक्षकाला रंगेहाथ पकडण्यात आले. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पिंपरी पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या मोहननगर पोलिस चौकी येथे मंगळवारी (दि. १५ एप्रिल) ही कारवाई केली.
नीलेश रमेश बोकेफोडे (वय ३८) असे रंगेहाथ पकडलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी २४ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ११ एप्रिल रोजी तक्रार केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २४ वर्षीय तक्रारदाराचे वाहन एका गुन्ह्यात पोलिसांनी जप्त केले. ते वाहन सोडविण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक नीलेश बोकेफोडे यांनी तक्रारदाराकडे ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ११ आणि १२ एप्रिल रोजी तक्रारीची पडताळणी केली. पोलिस उपनिरीक्षक नीलेश बोकेफोडे यांनी तक्रारदाराला दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी तसेच गुन्ह्यात जप्त केलेले वाहन सोडविण्यासाठी ४० हजारांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती ३० हजारांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी सापळा रचला. त्यावेळी उपनिरीक्षक बोकेफोडे यांना ३० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
चिखली मधील साने चौकात दोन गट आपसात भिडले. दोन्ही गटातील आरोपींनी एकमेकांवर कोयत्याने वार केले. तसेच कोयते हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण केली. ही घटना रविवारी (१३ एप्रिल) रात्री साडेनऊ वाजता साने चौक, चिखली येथे घडली. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
PCMC Crime: ट्रिपल सीट जाताना पाय लागला अन् दोन गट भिडले; मग कोयता काढला आणि थेट…
गणेश अंकुश राख (२४, चिखली) यांच्या फिर्यादीनुसार ऋषी लहाने, योगेश लहाने, अक्षय सपकाळ, अजय शामराव सोनावणे (२६), रोहन बाळासाहेब सावंत (२१, चिखली) आणि इतर चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी गणेश हे मित्रासोबत केक आणण्यासाठी साने चौकात गेले होते. त्यावेळी आरोपी ऋषी हा दुचाकीवरून ट्रिपल सीट जात होता. त्याचा गणेश यांना पाय लागल्याने ते चौकातच थांबले. त्यावेळी त्यांच्यात भांडण झाले. ऋषी याने इतर आरोपींना बोलावून घेत गणेश यांना मारहाण करत कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. गणेश यांच्या गळ्यातील साडेतीन तोळे वजनाची सोन्याची साखळी आरोपींची चोरून नेली.