संग्रहित फोटो
पुणे : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मेसमधील कचरा रस्त्यावर का टाकता, अशी विचारणा करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला तरुणाने बेदम मारहाण केल्याची घटना नाना पेठेतील निवडुंग्या विठोबा मंदिर येथे घडली आहे. याप्रकरणी ६२ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यावरून समर्थ पोलिसांत अमित भारत शिंदे (वय २७, रा. गंज पेठ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २७ जानेवारीला सकाळी आठच्या सुमारास घडली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, निवडुंग्या विठोबा मंदिर परिसरातील एका सोसायटीत मेस आहे. आरोपी मेसमधील कचरा रस्त्यावर फेकत असे. त्यामुळे तक्रारदाराने आरोपीला त्याबाबत विचारणा केली. त्याचा आरोपीला राग आला. त्याने तक्रारदाराच्या अंगावर धावून जात शिवीगाळ केली. तसेच, कचऱ्याची प्लॅस्टिकची बादली तक्रारदाराच्या डोक्यात मारली. त्यामुळे तक्रारदार जखमी झाले. तसेच, झटापट करून हाताने मारले. या भांडणात तक्रारदाराच्या गळ्यातील चांदीची चार तोळे वजनाची साखळी आणि त्यामधील सोन्याचे पाच ग्रॅमचे पान पडून गहाळ झाले.
दगडाने ठेचून मुलाचा खून
दरम्यान गेल्या काही दिवसाखाली नगर रस्त्यावरील वाघोली भागात वाघेश्वरनगर येथे एका अल्पवयीन मुलाचा लोखंडी रॉड तसेच दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीला बोलत असल्याच्या रागातून हा खून झाल्याचे सांगण्यात आले आहे. प्रेमप्रकरणातून खून झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. गणेश वाघू तांडे (१७) असे हत्या झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. याप्रकरणी लक्ष्मण पेटकर (वय ६०), नितीन पेटकर (वय ३१) आणि सुधीर पेटकर (वय ३२) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास घडली आहे.
निगडीत तरुणावर चाकूने हल्ला
गेल्या काही दिवसाखाली जुन्या भांडणाच्या कारणावरून टोळक्याने एका तरुणाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चाकूने वार करून जिवे मारण्याचाही प्रयत्न केलाय. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना निगडी येथील चिकन चौक येथे घडली आहे. भरत भागवत म्हस्के (३४, राहुलनगर, निगडी) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हृतिक सकट, सचिन जाधव, धनंजय उर्फ बबलू सूर्यकांत रणदिवे, सूरज कोंडिराम ओव्हाळ, गणेश उबाळे, विशाल ऊर्फ दुग्गु शंकर वैरागे आणि इतर साथीदारांवर गुन्हा दाखल झाला आहे. यातील रणदिवे, ओव्हाळ व वैरागे यांना पोलिसांनी अटक केली आहे.