सौजन्य - नवराष्ट्र टीम
पिंपरी : मोशी येथील कचरा डेपो परिसरात ८ जुलै रोजी झालेल्या भीषण दुर्घटनेप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी अँटोनी लारा रिन्युएबल एनर्जी प्रा. लि. कंपनीचे प्रकल्प प्रमुख आणि सुरक्षा अधिकाऱ्याविरुद्ध सदोष मनुष्यवधासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून एकाला अटक केली आहे. एसआरएफएलपी प्रक्रियेदरम्यान संभाव्य धोका माहिती असूनही आवश्यक सुरक्षा उपाययोजना न राबवल्यामुळे कचऱ्याचा भाग कोसळून नऊ कामगारांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
या प्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कर्मचारी रोहित मधुकर निकम (वय ५५) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अँटोनी लारा रिन्युएबल एनर्जी प्रा. लि. कंपनीचे प्रकल्प प्रमुख अशोककुमार सियाराम शरण गुप्ता (वय ५५) आणि सुरक्षा अधिकारी विजय रामराव सपकाळ (वय ३८) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून गुप्ता याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ जुलै २०२६ रोजी दुपारी सुमारास दीडच्या सुमारास मोशी येथील कचरा डेपोमध्ये ही दुर्घटना घडली. पिंपरी-चिंचवड शहरातील संकलित कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे काम महापालिकेने अँटोनी लारा रिन्युएबल एनर्जी प्रा. लि. कंपनीकडे सोपविले आहे. पावसाळ्यात एसआरएफएलपी प्रक्रियेदरम्यान धोका निर्माण होण्याची शक्यता असतानाही आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचा आरोप आहे. परिणामी एसआरएफएलपीचा काही भाग इमारतीवर आणि शेजारील रस्त्यावर कोसळून तेथे कार्यरत कर्मचाऱ्यांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला.
या दुर्घटनेत भावेश मोहन वाणी (३३), अक्षय राजू सावंत (३२), नागेश सर्जेराव गायकवाड (२७), सुनील भारत कोरके (३६), महेश सुरेशकुमार (३२), सनी अशोक माने (३६), राहुल धोंडीबा गायकवाड (३७), रणजित जयवंत पाटील (२२) आणि वामन दत्तू कसबे (५४) या नऊ जणांचा मृत्यू झाला.
याशिवाय अशोककुमार सियाराम शरण गुप्ता, मुनेन्द्र कुमार श्री सोमपाल सिंह, देवेंद्रकुमार श्रीवीरेंद्र सिंह, दयासाहेब किसन आरडे, सोमनाथ धुकाराम शेळके, रणवीर महेंद्रप्रताप सिंह, रामप्रताप अमरसिंह चव्हाण, सचिन रामदास दवडगांव, सुजाता संतोष शिंदे, विजय रामराव सपकाळ, महेश चंद्रकांत राजूत आणि भूषण अजय पाटील हे जखमी झाले आहेत.
फिर्यादीनुसार, प्रकल्प प्रमुख आणि सुरक्षा अधिकाऱ्यांना संभाव्य दुर्घटनेचा धोका माहिती असतानाही त्यांनी आवश्यक सुरक्षा उपाययोजना राबवल्या नाहीत. त्यांच्या निष्काळजीपणामुळे एसआरएफएलपीचा भाग कोसळून नऊ कामगारांचा मृत्यू झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम १०५, १२५(अ), १२५(ब) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
कंपनी मालक, मुख्य ठेकेदावर गुन्हा नाही?
या प्रकरणात ठेकेदार कंपनीत कामाला असणाऱ्या कामगारांवर गुन्हा का दाखल करण्यात आलेला आहे. मात्र कंपनी मालक, मुख्य ठेकेदार तसेच हलगर्जीपणा करणारे महापालिकेचे अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल का नाही? असा प्रश्न मृत्यांचे नातेवाईक विचारत आहेत.






