SRPF जवानाने पोलीस गणवेशातच सोनपेढीला घातला सव्वा दोन लाखांचा गंडा (Photo Credit- AI)
वर्दीचा दाखला अन् ‘खोट्या’ आईची माया
मिळालेल्या माहितीनुसार, मे. आर. सी. बाफना ज्वेलर्सच्या (आकाशवाणी चौक शाखा) व्यवस्थापक विनोदकुमार दिलीपसिंग चौधरी (६१, देवळाई रोड) याप्रकरणी तक्रार दिली आहे. १५ मे २०१८ रोजी संशयित आरोपी योगेश सुरेश सिंगणारे (रा. एसआरपीएफ कॅम्प, सातारा, छत्रपती संभाजीनगर) हा पोलीस गणवेशात सोनपेढीवर आला होता. त्याने आपले पोलीस ओळखपत्र दाखवून व्यवस्थापनाचा विश्वास संपादन केला. आपल्या आईच्या आजारपणासाठी तातडीने पैशांची गरज असून पत्नीचे जुने मंगळसूत्र विकायचे आहे, असे त्याने सांगितले.
सोनपेढीने ठेवला विश्वास
सोनपेढीने त्याच्यावर विश्वास ठेवून पहिल्यांदा ६१, ४८४ रुपयांचे दागिने खरेदी केले आणि रक्कम त्याच्या बैंक खात्यात ऑनलाइन जमा केली. त्यानंतर त्याने १५ मे २०१८ ते २४ ऑगस्ट २०१८ या कालावधीत वेळोवेळी गणवेशात किंवा ओळखपत्र दाखवून सोनपेढीला भेट दिली. वेगवेगळ्या नातेवाईकांचे सोने असल्याचे सांगून त्याने एकूण २,४९,३३३ रुपये पदरात पाडून घेतले. ही सर्व रक्कम सोनपेढीने त्याच्या बँक खात्यावर ऑनलाइन वर्ग केली होती.
पोलिस तपासात सत्य आले समोर
१८ ऑक्टोबर २०१८ रोजी पोलीस अधिकारी योगेश सिंगणारेला सोबत घेऊन सोनपेढीवर आले, तेव्हा व्यवस्थापनाला धक्का बसला. सिंगणारेने विकलेले सोने हे चोरीचे असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. नियमानुसार खरेदी-विक्रीचे व्यवहार केलेले असतानाही, आरोपीने चोरीचे सोने विकल्यामुळे पोलिसांनी सोन्याच्या सहा लगडी जप्त केल्या. यामुळे सोनपेढीचे पैसे आणि सोने दोन्ही गेल्याने मोठी फसवणूक झाली.
ज्वेलर्सची न्यायालयात धाव
याप्रकरणी सोनपेढीने सुरुवातीला वकिलामार्फत न्यायालयात याचिका दाखल केली होती. मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशानुसार, सातारा पोलिसांनी २२ डिसेंबर २०२५ रोजी योगेश सुरेश सिंगणारे विरुद्ध भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम ४२० (फसवणूक) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.






