9 वर्षीय अल्पवयीन मुलगी सामान आणण्यासाठी दुकानात गेली (फोटो सौजन्य-X)
सावन वैश्य, नवी मुंबई : एपीएमसी पोलीस ठाणे हद्दीत एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या एका तळीरामावर पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. एपीएमसी पोलीस ठाणे हद्दीतील परिसरात एक 9 वर्षीय अल्पवयीन मुलगी सामान आणण्यासाठी दुकानात गेली असता, त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या विनोदकुमार केदारनाथ पांडे याने अल्पवयीन मुलीला आईस्क्रीमचे अमिष दाखवले, पीडित मुलीने त्याला नकार देऊन दुकानाबाहेर येण्याचा प्रयत्न केला.
मात्र त्या नराधमाने तिला मध्येच अडवून बाहेर येऊन न देता तिच्या गालाचे चुंबन घेऊन तिला त्याच्यासोबत येण्यासाठी जबरदस्ती करत होता. पीडित मुलीने संघर्ष करत तेथून पळ काढला व घरी गेल्यावर घडलेला सर्व प्रकार पालकांना सांगितल्यावर, पालकांनी नराधम विनोदकुमार पांडे याला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी विनोदकुमार पांडे, वय 34 वर्ष, राहणार एपीएमसी भाजी मार्केट, मुळ राहणार उत्तर प्रदेश, यांच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
महिलांबाबत तसेच बालकांबाबत घडलेल्या गुन्ह्यांचा तपासाबद्दल साठ दिवसांची मुदत असते. अनेक वेळा पोलीस अशा गुन्ह्यात तक्रार घेत नाहीत असं बोललं जातं. मात्र एपीएमसी पोलीस ठाणे हे नवी मुंबईतील एकमेव असं पोलीस ठाणे आहे की ज्यांनी, तक्रार झाल्यावर विविध पुरावे जमा करून, आरोपीला न्यायालयात हजर केले, व अवघ्या 18 तासातच दोषारोप पत्र दाखल करून न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली आहे. पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या आदेशानुसार, व वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली, तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रणिता भाकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक ढमाले, पोलीस हवालदार दत्ता कदम, व हवालदार ताम्हणे यांनी सदरची कामगिरी केल्याने आरोपीला लवकरात लवकर शिक्षा झाली.