'हाय बेब .. तू हे जेव्हा वाचशील तोपर्यंत मी गेलेला ...', आणखी एका पत्नी पीडित पतीने उचललं टोकाचं पाऊल (फोटो सौजन्य-X)
Mumbai Crime News in Marathi : मुंबईतील विलेपार्ले येथील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये ४१ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली. या मृत व्यक्तीचे नाव निशांत सुमनराज त्रिपाठी असून निशांतची आई नीलम चतुर्वेदी (६४) या सामाजिक कार्यकर्त्या आहेत.त्यांनी या प्रकरणानंतर पोलिसात तक्रार दाखल केली. तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, २८ फेब्रुवारी रोजी निशांतचा मृतदेह हॉटेलच्या ४०२३ क्रमांकाच्या खोलीत फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळला. विमानतळ पोलिसांनी एडीआर नोंदवला आहे. पोस्टमॉर्टमनंतर, निशांतच्या पार्थिवावर सांताक्रूझ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
पोलिसांनी सांगितले की, तपासादरम्यान निशांतच्या मोबाईलमध्ये एक सुसाईड नोट सापडली. ज्यामध्ये त्याने त्याची पत्नी अपूर्वा पारिक आणि प्रार्थना मिश्रा (काकू) यांना त्याच्या मृत्यूसाठी जबाबदार धरले होते. तसेच, इंग्रजीत लिहिलेल्या संदेशात असे लिहिले होते, ‘हाय बेबी, तू हे वाचशील तेव्हा मी गेलेला असेन.’ मी तुमचा द्वेष करू शकतो, पण मी करत नाही. या क्षणी पण मी प्रेम निवडले. मी तेव्हाही तुझ्या प्रेम केलं होतो आणि आताही तुझ्यावर प्रेम करतो. मी वचन दिल्याप्रमाणे – हे प्रेम कधीही कमी होणार नाही. माझ्या आईला माहित आहे की मी किती संघर्ष केला आहे. त्यासाठी तू आणि प्रार्थना आंटी माझ्या मृत्यूसाठी कारणीभूत आहात. म्हणूनच मी तुला विनंती करतो, माझ्या आईकडे जाऊ नकोस. ती तुटली आहे, तिला एकटेच दु:ख सहन करू दे. ‘, असे त्याने त्यात लिहीलं होतं.
नीलम चतुर्वेदी यांच्या तक्रारी आणि सुसाईड नोटच्या आधारे, पोलिसांनी निशांतची पत्नी अपूर्वा पारिक आणि काकू प्रार्थना मिश्रा यांच्याविरुद्ध बीएनएसच्या कलम १०८ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे आणि घटनेचा तपास करत आहेत. निशांत मानसिक तणावाखाली होता की तो खरोखरच एखाद्या प्रकारचा छळ सहन करत होता याचा तपास पोलिस करत आहेत. तसेच पोलिसांनी पत्नी आणि काकूंना नोटीस बजावणार आहेत आणि दोघांचीही चौकशी करणार आहेत. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.