संग्रहित फोटो
वाई : वाईच्या एमआयडीसीतील श्रीनिवास मंगल कार्यालयाशेजारील एटीएम फोडून चोरट्यांनी १७ लाखांची रोकड लंपास केली आहे. कटरने एटीएम फोडत वरील भाग जाळल्याचे उघडकीस आले आहे. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी वाई पोलिसांची डिबी पथक व सातारा येथील एलसीबी पथके रवाना करण्यात आली आहेत.
वाईच्या एमआयडीसीत श्रीनिवास मंगल कार्यालयाशेजारी एक एटीएम आहे. ते खासगी मालकाचे असून, या एटीएमचा लाभ एमआयडीसीमधील हजारो कामगारांना होतो. हे एटीएम सकाळी ७ वाजता उघडायचे व रात्री ११ वाजता शटरला कुलूप लावून बंद केले जात होते. बुधवारी रात्री दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास चोरट्यांच्या टोळीने कटरच्या साहाय्याने एटीएम फोडून वरच्या भागातील की बोर्ड जाळला आणि आतील १७ लाखांची रोकड लंपास केली. सकाळी याची माहिती मिळताच वाई पोलिस घटनास्थळी पोहचले.
जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख यांच्या सूचनेनुसार तातडीने अप्पर पोलीस अधिक्षक वैशाली कडुकर व सातारा एलसीबीचे पोलिस निरीक्षक देवकर घटना स्थळावर पाेहचले. यावेळी वाईचे डिवायएसपी बाळासाहेब भालचीम, परिविक्षाधीन डिवायएसपी शाम पानेगावकर, वाईचे पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे, वाई डिबीचे प्रमुख पोलिस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज उपस्थित होते. वाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुधीर वाळुंज अधिक तपास करत आहेत.
सुरक्षा अधांतरीच
वाई एमआयडीसीतील एटीएम खासगी मालकीचे असल्यामुळे त्याची सुरक्षाही अधांतरीच होती. या एटीएमला सुरक्षा रक्षक नव्हता. दररोज रात्री हे एटीएम बंद केले जायचे. चोरट्यांनी ते फोडल्यानंतर त्याबाबतची तक्रार द्यायला कोणीही पुढे येत नव्हते. पोलिसांनी वारंवार पाठपुरावा केल्यानंतर तक्रार दाखल करण्यात आली.
हे सुद्धा वाचा : सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल 38 लाखांना घातला गंडा
सीसीटीव्हीहीचा अभाव
वाई एमआयडीसीत कामासाठी येणाऱ्या हजारो कामगारांना या एटीएमचा लाभ मिळतो. दररोज हजारो रुपये येथून काढले जातात. त्यामुळे सुरक्षेची उपाययोजना करण्याची गरज होती. मात्र या एमआयडीसीवर नजर ठेवण्यासाठी साधा सीसीटीव्हीही नसल्याची बाब समोर आली आहे.
18 लाखांची रोकड लंपास
दरम्यान गेल्या काही दिवसाखाली चंदगड येथील भर वस्तीतील एटीएम फोडून 18 लाख रुपये कारमधून घेऊन पलायन करत असताना पोलिसांनी गाडीचा पाठलाग केला असता पोलीस गाडीला धडक देऊन आरोपीने पलायन केले. हे सर्व आरोपी राजस्थानचे असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. ही घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. पोलिसांनी गाडी ताब्यात घेतली. तसेच रोख रक्कम सहा हजार घटनास्थळावर मिळून आली आहे.