अपघातात तरुणाचा मृत्यू (फोटो- सोशल मीडिया)
पिंपळगावच्या युवकाचे पोलिस भरतीचे स्वप्न अधूरे
पिंपळगावच्या तरुणाचा अपघातात मृत्यू
भरधाव जाणाऱ्या गाडीने तरुणाला चिरडले
केडगाव: भरधाव हायवा ट्रकने दिलेल्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना राहू वाघोली मार्गावर घडली.
निलेश मारुती चव्हाण (वय २७, रा. पिंपळगाव,ता दौंड) असे या अपघातात मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. दौंड तालुक्यातील कदम पाटील पेट्रोल पंप नजीक पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास निलेश चव्हाण हा ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर बैलगाडीला ओव्हरटेक करून पुढे गेला असता, शेजारून भरधाव जाणाऱ्या गाडीने त्याला (Crime) चिरडले. त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तो जखमी झाला.
अपघातानंतर नीलेशला त्वरित यवत येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यासंदर्भात सौरभ मंडले यांनी यवत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.फिर्यादीमधील माहितीनुसार नीलेश हा खुटबाव येथील एका खासगी कंपनीत कामाला होता.गरीब कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी निलेश खाजगी काम करून मागील अनेक दिसांपासून पोलीस भरतीचा सराव करत होता. नीलेशचे अन कुटुंबाचे स्वप्न बेचिराख झाले .कंपनीच्या कामानिमित्त ( दि.२३) बाहेरगावी गेला होता. मात्र वाघोली-पारगाव रस्त्याने पिंपळगावकडे दुचाकी क्रमांक (एम एच ४२ बी.डी. ९६१७) येत असताना त्याचा हा अपघात झाला. अपघातस्थळी मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अज्ञात वाहन चालकाविरोधात यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास यवत पोलिस करत आहे.
सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष
रस्त्यालगत उभ्या केलेल्या चारचाकी अन् ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलींना रेडियम (रिफ्लेक्टर) चिकटवलेले नसल्यामुळे वारंवार अपघात घडत आहेत. महामार्गांवर रस्त्याच्या कडेला अनेकदा ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॉल्या कधी रिकाम्या तर कधी रस्त्याच्या अक्षरशः कडेला उभ्या केलेल्या असतात. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून वेड्यावाकड्या अवस्थेत उभ्या असतात त्यामुळे वारंवार अपघात घडत असल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले.
नागरीक त्रस्त; प्रशासन सुस्त
रस्त्यावर मोठमोठे खड्डे, अपूर्ण रस्ते , रखडलेल्या मोऱ्या आणि पुलाची कामे यामुळे प्रवासी आणि स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. फुटलेल्या पाइपलाइन मुळे रस्त्यावर चिखल आणि साचलेले पाणी यामुळे वाहन चालवणे अवघड झाले असून, दुचाकी आणि चारचाकी वाहने घसरून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. याकडे प्रशासन आणि संबंधित ठेकेदारांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.






