(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मराठी, हिंदी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री किशोरी शहाणेंच्या गाडीचा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. ठाणे – मुंबई रस्त्यावर त्यांच्या गाडीला अपघात झाला आहे. किशोरी या शूटिंगनिमित्त प्रवास करत असताना त्यांच्या कारला दुसऱ्या वाहनानं धडक दिली आहे. सुदैवानं या घटनेत किशोरी शहाणे यांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही, मात्र त्यांच्या गाडीचे नुकसान झाले आहे. किशोरी शहाणेंनी सोशल मीडियावर या घटनेची माहिती शेअर केली आहे. जाणून घ्या नेमकं काय घडलं.
अभिनेत्री किशोरी शहाणेंच्या कारचा अपघात
किशोरी शहाणेंनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्यांच्या कारचे नुकसान झाल्याचं दिसत आहे. या कारच्या धडकेत त्यांच्या कारचा साईड मिरर पूर्णपणे तुटला आणि कारच्या दरवाजाचेही नुकसान झालं आहे. त्यांनी व्हिडिओमध्ये म्हटलं, ” इतरांचं जे नुकसान होतं त्याबद्दल जरा संवेदनशीलतेने बाळगा.. एक मोठी कार माझ्या उजव्या बाजूने आली, माझ्या कारचा आरसा तोडला आणि सिग्नलवरून उजवीकडे वळून वेगाने निघून गेली. हे बघून खूप दु:ख झालं. ”
त्या पुढे म्हणतात, ” आपण सगळेच आपल्या आयुष्यात व्यस्त आहोत, पण तुम्हाला उशीर होत असेल तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही बेधडकपणे गाडी चालवून दुसऱ्याचं नुकसान करावं. आजकाल कोणाकडेच वेळ नसतो.. आता पुन्हा मेकॅनिककडे जा, ते दुरूस्त करून घ्या, यामुळे उगाच मानसिक ताण वाढला आहे. यात माझी काहीच चूक नव्हती” अशी प्रतिक्रिया देत अभिनेत्री किशोरी शहाणेंनी त्यांचा संताप व्यक्त केला आहे.
किशोरी शहाणे यांनी यासंदर्भातला व्हिडिओ शेअर केला असून त्यांच्या चाहत्यांनी आणि सहकलाकरांनी कमेंट्स करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे.
किशोरी यांच्या कामाबद्दल बोलायचं तर त्या सध्या हिंदी टीव्ही इंडस्ट्रीतील माना की हम यार नहीं, या मालिकेतून त्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. किशोरी या नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असतात.






