इंदापूरच्या रेड्यात भरदिवसा घरफोडी; घरावरील सर्व पत्रे, लोखंडी अँगल नेले काढून (संग्रहित फोटो)
बावडा : इंदापूर तालुक्याच्या रेडा गावात भरदिवसा घरफोडी झाल्याची माहिती समोर आली आहे. अलका कृष्णा मोहिते या महिलेचे गावात असणारे बंद घर फोडून, घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य व घरावरील पत्रा तसेच चौकट भरदिवसा चोरून नेले. यासंदर्भात इंदापूर पोलीस स्टेशनअंतर्गत बावडा पोलीस दूरक्षेत्र येथे चार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, रेडा गावच्या अलका कृष्णा मोहिते या आषाढी एकादशीला पंढरपूरला (दि.६) गेल्याचा अंदाज बांधून अलका मोहिते यांच्या राहत्या घराचे दरवाजे मोडून घरावरील सर्व पत्रे, लोखंडी अँगल काढून घरातील 9600 किमतीचे साहित्य चोरून नेले. या घटनेची फिर्यादी देण्यात आली. अलका मोहिते यांचा पुतण्या पांडुरंग मोहिते व शेजाऱ्यांनी ही चोरी करताना आरोपींना पाहिले होते. त्यानुसार, चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल भरत जाधव आधिक तपास करत आहे.
दरम्यान, पोलिसांनी संबंधित घटनास्थळी भेट देऊन समक्ष पंचनामे केले आहेत. इंदापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली बावडा पोलीस दूरक्षेत्राचे भरत जाधव व त्यांचे सहकारी अधिक तपास करत आहेत. या चोरी प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
पुण्यात घरफोडी; पोलिस हतबल
दुसऱ्या एका घटनते, पुणे शहरातील घरफोड्यांपुढे पुणे पोलिसांची हतबलता लोटांगण घेऊ लागली असून, चोरटे पुढे अन् पोलिस मागे असेच काही चित्र गेल्या काही वर्षांपासून असल्याचे पाहिला मिळत आहे. कोट्यवधी रुपयांवर चोरटे डल्ला मारत असताना पोलिसांचे हात रिकामेच असून, गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण देखील किरकोळ स्वरूपातच आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यात या घटना सलग घडत असून, पुन्हा एकाच दिवशी सहा ठिकाणी घरफोडीचे प्रकार घडले आहेत. ज्यात लाखो रुपयांवर डल्ला मारला गेला आहे. त्यामुळे पुणेकर भयभीत आहेत.
पुण्यात सहा घटनांची नोंद
पुण्यात काही दिवसांपूर्वीच, नानापेठ, धायरी, लोहगाव, चंदननगर, फुरसुंगी व गंगाधाम चौकात चोरीच्या घटना घडल्या आहेत. नाना पेठेतील ज्येष्ठ नागरिक महिलेचा बंद फ्लॅट फोडून ४ लाख ५७ हजारांचा ऐेवज चोरला आहे. तर धायरीत कुटूंबिय घरात झोपलेले होते. तरी देखील चोरट्यांनी पत्रा कापून त्यांच्या घरातून २ मोबाइल चोरून नेले.