संग्रहित फोटो
पुणे : एलआयसी पॉलीसीच्या नावाखाली नागरिकांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या वाकडेवाडी येथील बनावट कॉल सेंटर’चा पर्दाफाश करीत शिवाजीनगर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. आरोपींकडे पुणे परिसरातील नामांकित ३५ कंपन्यांचे बनावट रबरी शिक्के मिळून आले असून १५ मोबाईल, १५० सिम कार्ड आणि वेगवेगळ्या ३० बँकांचे बँक खाती, चेक बुक मिळाले आहेत. आरोपींनी एलआयसीच्या नावाने बनावट ओळखपत्र तयार केले होते. प्राथमिक तपासात आरोपींनी दोघांची फसवणूक केल्याचे समोर आले असून त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
शंकर कारकुन पोखरकर (वय ४२, रा. कात्रज), मेहफूज मेहबुब सिद्दीकी (वय ४०, रा. औंध), अशिष रामदास मानकर (वय ४८, वाघोली) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलीस उपायुक्त संदीपसिंह गील, वरिष्ठ निरीक्षक चंद्रशेखर सावंत, गुन्हे निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक के. बी. डाबेराव, अंमलदार नलिनी क्षिरसागर, रुचिका जमदाडे, स्वालेहा शेख, सरस्वती कांगणे यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.
पोखरकर हा मुख्य सूत्रधार आहे. आपण एलआयसी एजंट असल्याचे सांगून जादा परताव्याचा आमिषाने आरोपीने २०२१ मध्ये शिवाजीनगर भागातील एकाकडून ५ लाख ४ हजार रुपये उकळले. काही दिवसांनी पैसे मिळतील असे त्यांना सांगण्यात आले होते. यादरम्यान खात्री करण्यासाठी फिर्यादीने संपर्क साधला असता आरोपींचा फोन बंद लागला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत संबंधित व्यक्तीने २०२३ मध्ये शिवाजीनगर पोलिसांत धाव घेत फिर्याद दिली. तेव्हापासून शिवाजीनगर पोलीस आरोपींच्या मागावर होते. आरोपी सातत्याने राहण्याचे ठिकाण बदलत असल्याने मिळून येत नव्हते.
दरम्यान, तांत्रिक तपासावरून शिवाजीनगर सायबर पथकातील अंमलदार आदेश चलवादी, तेजस चोपडे यांनी बनावट कॉल सेंटरचा ठावठिकाणा घेतला. त्यानुसार वाकडेवाडी येथे फ्यूचर ग्लोबल सर्विस नावाने सुरू असलेल्या कॉल सेंटरवर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पथकाला येथून विविध कंपन्याचे १५० सिम कार्ड, ३० विविध बँकेचे खाती व चेक बुक, १५ मोबाईल, २९ डाटा रजिस्टर, १२ एटीएम कार्ड, ०५ पॅन कार्ड, ०२ संगणक, ३५ विविध कंपन्यांच्या नावाचे बनावट शिक्के मिळून आले. याप्रकरणात पोलिसांनी पोखरकर, सिद्दिकी आणि मानकर यांना अटक केली. प्राथमिक तपासात आरोपींनी दोघांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. मात्र, त्यांनी आणखीही बऱ्याच लोकांना गंडा घातल्याचे समजत असून त्यादृष्टीने पोलीस तपास करीत आहेत.
एलआयसीच्या ग्राहकांचा मिळविला डेटा
अटक करण्यात आलेल्या आरोपींमधील एकजण यापूर्वी एलआयसी पॉलिसी काढून देण्याचे काम करत होता. त्यातून त्याने एलआयसीचा ग्राहकांचा डेटा मिळविला. त्यावरून नागरिकांना संपर्क केला जात होता.