धक्कादायक ! प्रियकराच्या मदतीने लेकीने आईलाच संपवलं; हत्या करून मृतदेह ठेवला फ्रीजमध्ये अन्... (संग्रहित फोटो)
रांची : झारखंड राज्यातील रांची येथे एका अल्पवयीन मुलीने तिच्या प्रियकराच्या मदतीने आपल्या आईची हत्या (Murder Case) केली. मुलीने तिच्या मृत वडिलांचे पैसे, नोकरी आणि मालमत्तेच्या लोभातून हा गुन्हा केला आहे. ही घटना दोरंडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मनितोला परिसरात घडल्याचे वृत्त आहे.
हत्येचा आरोप असलेल्या मुलीला मृत महिलेने १७ वर्षांपूर्वी, ती ६ महिन्यांची असताना दत्तक घेतले होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रकरणी मुलीच्या प्रियकरासह दोघांना बिहारमधील गयाजी येथून अटक करण्यात आली आहे. मुलीलाही ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, मृत महिलेची ओळख नाहिदा परवीन अशी पटली आहे. नाहिदाची हत्या एका कटाचा भाग म्हणून करण्यात आली होती आणि पुरावा लपवण्यासाठी तिचा मृतदेह घरातील डीप फ्रीजरमध्ये ठेवण्यात आला होता.
दरम्यान, नाहिदाचे पती वीज विभागात काम करत होते आणि ४ वर्षांपूर्वी त्यांच्या मृत्यूनंतर, तिच्या कुटुंबाला सुमारे ४५ लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळाली. याच पैशांवरून या अल्पवयीन मुलीने आईची हत्या करण्याची योजना आखली. यासाठी तिने तिचा प्रियकर याची मदत घेतली. प्रियकराच्या मदतीने तिने ही हत्या केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.
प्रियकर आणि त्याचा मित्र घरी आला अन्…
गुन्हा करण्यासाठी आरोपी मुलीने तिचा प्रियकर आणि त्याच्या मित्राला घरी बोलवले. त्यानंतर त्या तिघांनी मिळून नाहिदावर हल्ला केला. एका आरोपीने तिचे हात धरले, दुसऱ्याने तिचे पाय धरले आणि तिसऱ्याने उशीने तिचा गळा दाबला. यादरम्यान, नाहिदाने पळून जाण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे तिच्या मानेवर जखम झाली आणि रक्तस्त्राव होऊन तिचा मृत्यू झाला. हत्येनंतर, ते दोघे जण घटनास्थळावरून पळून गेले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आरोपी मुलीने तिच्या आईच्या मृत्यूची बातमी देण्यासाठी नातेवाईकांना फोन केला.
शेजाऱ्यांना संशय आल्याने रहस्य उघड
शेजाऱ्यांच्या लक्षात आले की, नाहिदाच्या शरीरावर जखमा आहेत आणि तिच्या मानेवर एक जखम आहे, ज्यामुळे त्यांना संशय आला. आईच्या मृत्यूनंतर, आरोपी मुलीने ऑनलाईन मिठाई मागवून खाल्ली होती आणि या वागण्यामुळेही शेजाऱ्यांमध्ये संशय निर्माण झाला. त्यानंतर पोलिसांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली, ज्यांनी आरोपी मुलीला ताब्यात घेऊन तिची कसून चौकशी केली. त्यानंतर या सर्व प्रकाराचे बिंग फुटले.






