संग्रहित फोटो
कराड : राज्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून अपघाताच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता कराडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंढे (ता. कराड) गावच्या हद्दीत कराड- पाटण मार्गावर दोन दुचाकींची जोरदार धडक झाली. या अपघातात डॉक्टरचा मृत्यू झाला आहे, तर युवक गंभीर जखमी झाला आहे. बुधवार (दि. ३०) रोजी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे.
डॉ. निवास दत्तू वीर (वय ६३, मूळ रा. तुळसण, ता. कराड, सध्या रा. विमानतळ-वारुंजी, ता. कराड) असे अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरांचे नाव आहे. तर मुजम्मिल फरीन सय्यद (वय २५, रा. केसे-पाडळी, ता. कराड) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव असून, त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तुळसण येथील डॉ. निवास वीर हे कुटुंबीयांसह विमानतळ येथे वास्तव्यास होते. त्याच ठिकाणी त्यांचे क्लिनिक आहे. बुधवारी सकाळी ते दुचाकीवरून मुंढे गावात गेले होते. तेथून घरी परतत असताना कराड – पाटण महामार्ग ओलांडताना पाटणहून आलेल्या दुचाकीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामध्ये डॉ. निवास वीर व दुसऱ्या दुचाकीवरील मुजम्मिल सय्यद हा युवक गंभीर जखमी झाला.
परिसरातील ग्रामस्थांनी त्याठिकाणी धाव घेत दोन्ही जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच डॉ. निवास वीर यांचा मृत्यू झाला. याबाबत मृत निवास वीर यांचे बंधू विलास वीर यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मुजम्मिल सय्यद याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शहर पोलिस तपास करत आहेत.