संग्रहित फोटो
चाकण : राज्यासह देशभरात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अशातच आता पुणे जिल्ह्यातून एक मोठी घटना समोर आली आहे. पुणे-नाशिक महामार्गावर चाकण हद्दीत गुरुवारी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात घडला आहे. एका खाजगी बसने भरधाव वेगात येत ५ ते ६ दुचाकी व एका चारचाकी वाहनाला जोरदार धडक दिली आहे. या अपघातात दोन जण गंभीर जखमी तर चार ते पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत.
नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बसचालक मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत होता. वाहनांना मागून जोरदार धडक दिल्यानंतर बसवरून नियंत्रण सुटल्याने ती डिव्हायडर ओलांडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेली आणि दगडाला अडकली. अपघातानंतर बसचालक घटनास्थळावरून फरार झाला, आणि पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी
अपघातात जखमी झालेल्यांना तातडीने जवळच्या दवाखान्यात उपचारासाठी हलवण्यात आले, तर अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.
अपघातग्रस्त अभिषेक जोशी यांनी सांगितले, “मी छत्रपती संभाजीनगरहून पुण्याकडे जात असताना स्वप्न नगरीजवळ मागून अचानक बसने जोरदार धडक दिली. त्या वेळी माझ्या गाडीत पत्नी आणि मुलगी होत्या. परमेश्वर कृपेने त्यांना गंभीर दुखापत झाली नाही, मात्र गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.”
कठोर कारवाई करण्याची मागणी
या भीषण घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, त्यांनी मद्यधुंद चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी घटनास्थळी सुरक्षा आणि वाहतूक नियंत्रण राखले असून, बस चालकाचा शोध सुरू ठेवला आहे.
पोलिस सूत्रांनी सांगितले की, अपघाताचे सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत आणि बस चालकास शोधण्यासाठी तपास पथके राबवण्यात आलेली आहेत. तसेच, जखमींवर उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवले जात आहे. हा प्रकार महामार्गावर मद्यधुंद वाहनचालकांमुळे होणाऱ्या धोक्याचे गंभीर उदाहरण ठरतो. नागरिकांनी या घटनेमुळे सार्वजनिक सुरक्षा उपाय, वाहन तपासणी आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे.