आळेफाट्यात दिवसाढवळ्या तरुणीवर हल्ला; ‘लिव्ह-इन’ पार्टनरने रस्त्यातच गाठलं अन् ब्लेडन्...
आळेफाटा : आळेफाटा एस. टी. स्थानक परिसरात घडलेल्या एका धक्कादायक प्रकाराने परिसरात खळबळ उडाली. २० वर्षीय तरुणीवर तिच्याच ‘लिव्ह-इन पार्टनर’ने ब्लेडने हल्ला केल्याची घटना समोर आली असून, आळेफाटा पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हल्ल्यानंतर आरोपी फरार झाला असून, पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.
पूजा सुभाष पांचाळ (वय २०, मूळ रा. लातूर) असे जखमी तरुणीचे नाव आहे. तिच्यावर आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा ही आरोपी नागेश भगवान थोरात याच्यासोबत काही काळ लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती.त्यांना दोन मुलेही आहेत. मात्र, आरोपीच्या दारूच्या व्यसनामुळे सतत वाद होत असल्याने पूजा काही दिवसांपूर्वी मुलांसह आळेफाट्यात येऊन राहत होती. येथे ती ‘१४ नंबर’ परिसरातील एका कला केंद्रात नृत्यांगना म्हणून काम करत होती.
बुधवारी सकाळी पूजा तिच्या मैत्रिणीसोबत एस.टी. स्थानक परिसरात खरेदीसाठी आली असताना आरोपी नागेश तेथे आला. त्याने पूजाला पुन्हा लातूरला सोबत येण्याचा आग्रह केला. मात्र, तिने नकार दिल्यानंतर संतापलेल्या नागेशने खिशातून ब्लेड काढून तिच्या चेहऱ्यावर आणि कानाजवळ वार केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. घटनेनंतर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत जखमी पूजाला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल केले. पीडितेच्या फिर्यादीवरून आळेफाटा पोलीस ठाण्यात नागेश थोरात याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पुरुषोत्तम थोरात पुढील तपास करत आहेत.
मुलाच्या शौचावरुन वाद; नंतर थेट हत्याच
बिहारच्या गोपाळगंज जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे, ज्याने संपूर्ण राज्याला हादरवलं. क्षुल्लक कारणावरुन सुरु झालेल्या वादाचे पुढे भीषणतेत रुपांतर झालं आणि जमावाने मारहाण करत महिलेचा जीव घेतला. घटना गुरुवारी घडल्याचे सांगण्यात येत असून मुलाच्या शाैचावरुन हा वाद सुरु झाला होता.






