छत्रपती संभाजीनगरमध्ये सराईतांकडून गोळीबाराचा थरार; पहाटेच्या सुमारास टोळक्याचा राडा
छत्रपती संभाजीनगर : मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन परिसरात सोमवारी पहाटे सराईत गुन्हेगारांच्या टोळक्याने थेट गोळीबार करून दहशत निर्माण केली. घरावर दगडफेक करत एका नागरिकाचा जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मदतीसाठी धावून आलेल्या नागरिकांनाही जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही; मात्र, संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.
याप्रकरणी शुभम भिखुलाल जाट, मयूर संजय उनगे, शिवा रमेश भालेराव, गोल्या उर्फ विजय दिनकर धनई, मनोज संजय पडूळ, सागर प्रशांत राऊत आणि अमर उर्फ अतुल गणेश पवार यांच्याविरोधात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी वेगाने तपास करत अवघ्या काही तासांत सातही आरोपींना अटक केली.
फिर्यादी सचिन बाली लाहोट (वय ३५, रा. शिवशाहीनगर, मुकुंदवाडी) यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास त्यांच्या घराच्या दरवाजावर मोठा दगड आदळल्याचा आवाज झाला. बाहेर काहीजण शिवीगाळ करत घराबाहेर येण्यासाठी चिथावत होते. खिडकीतून पाहिले असता शुभम जाटच्या हातात गावठी कट्टा तर इतरांच्या हातात तलवारी व चाकू होते. दरवाजा न उघडल्याने टोळक्याने दगड मारून तोडण्याचा प्रयत्न केला. भीतीपोटी लाहोट गच्चीवर गेले असता शुभम जाटने त्यांच्या दिशेने गोळी झाडली; मात्र ते बचावले.
जमाव वाढताच आरोपींचे घटनास्थळावरून पलायन
गोळीबाराचा आवाज ऐकून नागरिक जमा झाले असता टोळक्याने मध्ये पडणाऱ्यांनाही ठार मारण्याच्या धमक्या दिल्या. जमाव वाढत असल्याचे लक्षात येताच आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. याआधी मोबाईल चोरीच्या वादातून हा हल्ला झाल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. तर दुसरीकडे माहिती मिळताच पुंडलिकनगर पोलिस ठाण्याच्या डीबीचे उपनिरीक्षक अर्जुन राऊत आणि गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना
आरोपींच्या शोधासाठी तातडीने तीन विशेष पथके रवाना करण्यात आली. ही कारवाई उपनिरीक्षक अर्जुन राऊत, सुनील म्हस्के, जमादार प्रकाश डोंगरे, शिवाजी शिंदे, संदीप बीडकर, अजय कांबळे, विलास साळुंके, अंकुश वाघ आदींनी केली.
पाण्याच्या टाकीत लपलेला आरोपी जेरबंद
शुभम जाटचे घर बीड बायपासवरील म्हस्के पेट्रोल पंप परिसरात असून, उपनिरीक्षक अर्जुन राऊत यांच्या पथकाने तेथे छापा टाकला. छापा पडताच शुभम गच्चीवरून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. पोलिसांनी घराला चारही बाजूंनी वेढा दिल्यानंतर तो गच्चीवरील पाण्याच्या टाकीत लपून बसला.
टाकी फोडून बाहेर काढलं
बाहेर काढताना त्याने खिशातील ब्लेड काढून स्वतःला इजा करण्याची धमकी दिली. त्याच्या आई, बहीण व भावानेही पोलिस कारवाईत अडथळा आणला. अखेर पोलिसांनी टाकी फोडून शुभमला ताब्यात घेतले. खाली आणताना झालेल्या झटापटीत आरोपी व पोलिस खाली पडले. मात्र, अखेर अटक करण्यात आली.
हेदेखील वाचा : धक्कादायक! नोकरीचे आमिष नंतर महिलांसोबत लैंगिक संबंध अन् अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड; 3 आरोपींना अटक






