सवलतीच्या आमिषाने शेकडो नागरिकांना लाखोंचा गंडा; संतप्त नागरिकांनी अखेर दुकानाचे कुलूपच तोडले अन्... (संग्रहित फोटो)
कराड : आगाशिवनगर (मलकापूर ता. कराड) येथे परप्रांतीय व्यक्तींनी अवाजवी सवलतीचे आमिष दाखवून शेकडो नागरिकांची लाखोंची फसवणूक केली. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. ‘सोना ट्रेडर्स’ या भांडी, फर्निचर व इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दुकानात २५ ते ५० टक्के डिस्काउंटच्या आश्वासनावर आगाऊ रक्कम घेण्यात आली. दुकान बंद आढळताच संतप्त गुंतवणूकदारांनी शटर तोडून वस्तू ताब्यात घेतल्या.
आगाशिवनगरातील वृंदावन कॉलनीमध्ये हे दुकान गेल्या महिन्यात सुरू झाले होते. काही ग्राहकांना सुरुवातीला वस्तू देत विश्वास संपादन करण्यात आला. त्यामुळे बुकिंग वाढत जाऊन सुमारे ७०० ते ८०० जणांनी आगाऊ रक्कम जमा केली. प्रत्येक वस्तूसाठी पूर्ण आगाऊ भरल्याची पावती ग्राहकांकडे आहे. गुरुवारी रात्री दुकान बंद केल्यानंतर मध्यरात्री ते थोडावेळ उघडून पुन्हा बंद केल्याचे स्थानिकांनी पाहिले.
दरम्यान, शुक्रवारी सकाळी ठरलेल्या वेळेत दुकान न उघडल्याने ग्राहकांनी गर्दी केली आणि व्यापारी फरार झाल्याची शंका बळावली. त्यानंतर संतप्त नागरिकांनी दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत उपलब्ध वस्तू उचलण्याची चढाओढ केली. यावेळी काहींमध्ये बाचाबाचीही झाली. या घटनेनंतर अनेक गुंतवणूकदारांनी कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदवल्या आहेत. पोलिसांनी तपास सुरू केला असून, संबंधित परप्रांतीय व्यक्तींचा शोध सुरू करण्यात आला आहे.
सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकत आहेत नागरिक
गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण यांसारख्या घटना घडत आहेत. फसवणुकीच्या घटनाही लक्षणीय आहेत. असे असताना आता जनजागृती आणि वारंवार सतर्क केल्यानंतरही लोक सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकत आहेत. शहरात अशाप्रकारच्या घटनांमध्ये वाढ झाली.
हेदेखील वाचा : वाढता सायबर फ्रॉड थांबवण्यासाठी टेलिकॉम विभाग लागू करणार नवे नियम! या कंपन्यांना करावे लागणार मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन






