संग्रहित फोटो
पुणे : हाताला काम मिळविण्याच्या आशेने पुण्यात चौघांनी पाऊल ठेवले. पुर्वीपासून पुण्यात काम करणाऱ्या त्या मित्रांना संपर्क केला. रेल्वेने आलेल्या या चौघांना मात्र पहिलाच ‘झटका’ रिक्षाचालकांनी दिला. त्यांना इच्छितस्थळी सोडण्याचा बहाणा केला आणि निर्जनस्थळी मारहाण करीत लुटल्याची घटना पुणे स्टेशन भागात घडली. पुण्यनगरीत पाऊल ठेवताच आलेल्या या अनुभवाने चौघेही भितीच्या छायेत आहेत. दुसरीकडे शहरात रिक्षाचालकांनी लुटल्याच्या ७ घटना घडल्या आहेत. रिक्षाच्या आडून गुन्हेगारी फोफावत असल्याचेही दिसत आहे. याप्रकरणी विशाल चव्हाण (वय २०, रा. चाकण) याने तक्रार दिली असून दोन अनोळखी व्यक्तींवर बंडगार्डन पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी, तक्रारदार मूळचा बिहारचा असून तो चाकण येथे एका आस्थापनेत काम करतो. त्याचे चार समवयस्क मित्र रोजगाराच्या शोधात पुण्यात आले होते. दिनांक ३० डिसेंबरला पहाटे रेल्वेने ते पुण्यात दाखल झाले. तक्रारदारसह सर्व तुकाराम शिंदे वाहनतळासमोरील रस्त्यावर आले, तेथे त्यांनी घरी जाण्यासाठी काही रिक्षाचालकांकडे विचारणा केली. त्यावर एका रिक्षाचालकाने त्यांना घरापर्यंत सोडण्यासाठी होकार दिला.
तक्रारदार तरूण आणि त्याचे मित्र, असे पाच जण असल्याने दोन रिक्षा कराव्या लागतील, असे त्या रिक्षाचालकाने सांगितले आणि अन्य एका रिक्षाचालकाला तेथे बोलावून घेतले. त्यानंतर ते पाच जण दोन रिक्षात बसून मार्गस्थ झाले. मात्र, रिक्षाचालकांनी त्यांना निर्जन स्थळी नेले. तेथे रिक्षाचालकांनी त्यांना शिवीगाळ केली. त्यांच्याकडील बाराशे रुपयांची रोकड काढून घेतली. तर, तक्रारदाराच्या फोनमधून यूपीआयद्वारे चार हजार नऊशे रुपये पाठवून घेतले. त्यानंतर रिक्षाचालक तेथून पसार झाले. त्यानंतर तरुणांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.
बेशिस्तांकडे यंत्रणांचा काणाडोळा
स्टेशन परिसरात गेल्या काही दिवसांत रिक्षा चालकांच्या वादावादीच्या घटना घडल्या आहेत. तसेत, प्रवाशांशी उद्धट वर्तनासह मद्यपान किंवा अन्य व्यसन करून वाहने चालविले जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. विशेषत: रात्रीच्या वेळेला हे प्रकार अधिक घडतात. वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून काणाडोळा केला जात आहे.
हे सुद्धा वाचा : संसाराची राखरांगोळी! जास्त बोलते म्हणून नवऱ्याने थेट बायकोचा…; राज्य हादरलं
रिक्षा चालकांनी लुटल्याच्या सात घटना
शहरात रिक्षा चालकांनी प्रवाशांना लुटल्याच्या गेल्या दोन महिन्यात ७ हून अधिक घटना घडल्या आहेत. यात स्वारगेट परिसरात दोन घटना, कात्रज व मार्केट यार्ड येथील प्रत्येकी एक घटना आणि पुणे स्टेशन भागातील ३ घटनांचा समावेश आहे. त्यामुळे रिक्षा चालकांच्या आड लपलेल्या चोरट्यांना म्हणजेच गुन्हेगारांना चाप लावण्याची गरज व्यक्त केली जात आहे.