पुण्यात तरुणीचा अपघाती मृत्यू (फोटो- istockphoto)
पुणे: Pune Accident News: शहर प्रतिनिधी. बाणेर भागात एका भरधाव डंपरच्या पाठिमागील चाकाखाली सापडून एका आयटी अभियंता तरुणीचा मृत्यू झाला. तर, तिची सहप्रवासी मैत्रिण गंभीर जखमी झाली. अपघातानंतर डंपरचालकाने पळ काढला. पोलिसांनी त्याला रात्री उशिरा अटक केली. तेजल प्रकाश तायडे (२७, रा. तलासरी, ठाणे) असे मृत तरुणीचे नाव आहे. हा अपघात गुरुवारी (१९ जून) मध्यरात्री घडला. याच दिवशी तेजलचा वाढदिवस होता. तर, प्राची जगन्नाथ पाचंगे (२८, रा. डांगे चौक, थेरगाव) हिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना बाणेरमधील ज्युपिटर हॉस्पिटल परिसरात घडली.
पोलिसांच्या माहितीनुसार, तेजल आयटी अभियंता होती. ठाण्यातील एका कंपनीत काम करत होती. १६ जूनपासून कामानिमित्ताने पुण्यात आली होती. गुरुवारी तिचा वाढदिवस होता. त्यामुळे मैत्रीणीसोबत ती बालेवाडी हायस्ट्रीट परिसरात जेवण्यास गेली होती. जेवणानंतर केक घेऊन दोघी घराकडे निघाल्या. त्यावेळी गणेश मंदिर चौकात भरधाव वेगात डंपर जात होता. त्यावेळी हा अपघात झाला. यात तेजल गंभीर जखमी झाली. तिला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी प्राची पाचंगे हिच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंदवला असून, पोलिसांनी डंपरचालक राहुल भीमराव राठोड (२४, रा. भोंडवे वस्ती, रावेत) याला रात्री अटक केली.
महिनाभरात १४ जणांचा मृत्यू
मार्केटयार्डमधील गंगाधाम चौकात ट्रकच्या धडकेत एका विवाहितेचा मृत्यू झाल्यानंतर शहरातील जड वाहतूकीचा प्रश्न उपस्थित झाला होता. प्रमुख रस्त्यांवर डंपर, सिमेंट मिक्सर आणि ट्रक यांसारख्या अवजड वाहनांना बंदी असतानाही अनेक चालक नियम धुडकावत आहेत. त्यामुळे गंभीर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या महिनाभरात शहरात विविध ठिकाणी १४ जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे.
तरुणीचा दुचाकीवरील तोल गेल्याने त्या रस्त्यावर पडल्या. त्याचवेळी तेथून जाणाऱ्या डंपरचे मागील चाक तेजलच्या अंगावरून गेले. यात गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाला. चालकाला अटक करून, त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.
– चंद्रशेखर सावंत (वरिष्ठ निरीक्षक, बाणेर पोलिस ठाणे)
HIT AND RUN: 19 वर्षीय इंजिनिअरिंगची विद्यार्थिनीने उडवली स्कुटी, अपघातात महिलेचा मृत्यू
पनवेलमध्ये भीषण अपघात
पोर्शे कार अपघात सगळ्यांना स्मरणात असेलच. काही महिन्यापूर्वी एका श्रीमंतांच्या पोराने दोन बाईकस्वारांना चिरडून ठार मारलं होत. आता नवी मुंबईच्या न्यू पनवेलमध्ये असाच एक प्रकार समोर येत आहे. एका धनिकपुत्रीने मर्सिडीज कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या दोघांना उडवले आहे. कार चालक १९ वर्षीय मुलगी असून तीच नाव तिथी सिंग असे आहे. ती इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. हा अपघात नवीन पनवेल येथील हिरानंदानी पुलावर बुधवारी रात्री 8.45 वाजता हा अपघात घडला. खारघर पोलिसांनी याप्रकरणी भरधाव वेगात मर्सिडीज बेंझ कार चालवणाऱ्या मुलीला अटक केली आहे.